आधी मनसेने बडतर्फ केले, नंतर भाजपने वेटिंगवर ठेवले, हो नाही म्हणता म्हणता अखेर वैभव खेडेकरांचा प्रवेश
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Vaibhav Khedekar: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभव खेडेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर खेडेकर यांच्या चेहऱ्यावर कमालीचे हास्य होते.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बडतर्फ केल्यानंतर गेल्या एक दीड महिन्यांपासून भारतीय जनता पक्षाने वेटिंगवर ठेवलेले कोकणातील नेते वैभव खेडेकर यांचा कमळ हाती घेण्याचा प्रवास अखेर पूर्ण झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेडेकर यांच्या प्रवेशाचा फायदा भाजपला होण्याची शक्यता कोकणातील जाणकारांनी व्यक्त केली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभव खेडेकर यांनी भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेतले. प्रवेशानंतर खेडेकर यांच्या चेहऱ्यावर कमालीचे हास्य होते. भाजप प्रवेश झाल्यानंतर त्यांनी रविंद्र चव्हाण यांना कडकडून मिठी मारली. तसेच इतर सहकाऱ्यांना देखील त्यांनी धन्यवाद दिले. भाजप नेतृत्वाकडून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दोन वेळा तब्बल ३०० गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईत मोठे शक्तिप्रदर्शन केले होते
advertisement
राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या वैभव खेडेकर यांच्या गळ्यात भाजपचे उपरणे पडल्याने हुश्श सुटलो... अशा भावना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या होत्या. याआधी वैभव खेडेकर यांनी दोन वेळा तब्बल ३०० गाड्यांचा ताफा घेऊन येत मुंबईत मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. पण, दोन्ही वेळेला त्यांचा पक्षप्रवेश झाला नाही. मात्र, आज अतिशय शांततेत कमी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वैभव खेडेकर यांचा पक्ष प्रवेश पार पडला. वैभव खेडेकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे कोकण विभागात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाची ताकद वाढेल, अशी शक्यता कोकणातील राजकीय जाणकार सांगतात.
advertisement
वैभव खेडेकर यांनी सुटकेचा निश्वास टाकला
वैभव खेडेकर यांची पक्षविरोधी कारवाया केल्याने मनसेतून हकालपट्टी करण्यात आली. पक्ष स्थापनेपासून खेडेकर हे राज ठाकरे यांच्याबरोबर होते. कोकणात मनसेला वाढविण्यात आणि पक्षाच्या बांधणीत त्यांचे महत्त्वाचे काम होते. तसेच राज्यातील एकमेव खेड नगर पालिकेवर मनसेचा झेंडा रोवण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. मात्र काही दिवसांपूर्वी मनसेतून खेडेकर यांची हकालपट्टी करण्यात आली. मनसेतून बाहेर पडल्यानंतर खेडेकर हे भारतीय जनता पक्षात प्रवेशसाठी इच्छुक होते. शीर्षस्थ नेत्यांसोबत त्यांची बोलणीही झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होईल, यासाठी खेडेकर यांना पक्षात प्रवेश देण्यास भाजपही तयार झाले. परंतु कुठल्याशा कारणाने त्यांचा पक्षप्रवेश रखडला. भाजपमध्ये प्रवेशही नाही आणि त्यांच्या नगर परिषदेचे आरक्षणही महिलेसाठी राखीव झाल्याने खेडेकर यांना दुहेरी धक्का बसला. परंतु आज प्रवेश झाल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला असणार हे नक्की...
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 14, 2025 5:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आधी मनसेने बडतर्फ केले, नंतर भाजपने वेटिंगवर ठेवले, हो नाही म्हणता म्हणता अखेर वैभव खेडेकरांचा प्रवेश