२० हजार मतदान बाहेरून आणलं, आमदार भुमरे यांची अजब कबुली, एकनाथ शिंदेंनी डोळे वटारताच...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Vilas Bhumare: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळावात भाषण करताना विलास भुमरे यांनी बोलण्याच्या नादात धक्कादायक कबुली देऊन टाकली.
छत्रपती संभाजीनगर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण मतदार यादीवर काम केले पाहिजे, असे सांगताना मी विधानसभेला २० हजार मतदान बाहेरून आणले, अशी अजब आणि धक्कादायक कबुली शिवसेनेचे नेते, आमदार विलास भुमरे यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच दिली. राज्यात आणि देशात मतचोरीवरून विविध आरोप होत असताना भुमरे यांनी बाहेरून मतदान आणले, असा दावा करून आरोपांना एकप्रकारे हवा दिली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरला मोर्चा काढणार आहेत. त्याआधीच शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरला जाऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळावात भाषण करताना विलास भुमरे यांनी बोलण्याच्या नादात धक्कादायक कबुली देऊन टाकली.
advertisement
विधानसभा निवडणुकीत २० हजार मतदान बाहेरून आणले
पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांनी भाषणात बोलताना विधानसभा निवडणुकीत २० हजार मतदान बाहेरून आणले असे सांगितले. मात्र मंचावर बसलेल्या एकनाथ शिंदे यांनी इशारा करताच अर्थात सावरून घ्यायचा सल्ला देताच लागलीच सुधारणा करत मतदान बाहेरून आणले म्हणजेच स्थलांतरित मतदार होते, त्यांना मतदान करण्यासाठी विधानसभेच्या वेळेस आणले असा खुलासा त्यांनी लगोलग केला. विलास भुमरे यांच्या टायमिंगने सभागृहात एकच हशा पिकला.
advertisement
आम्ही देणारे आहोत, घेणारे नाहीत
धनुष्यबाण मिळाला तेव्हा मला लोकांनी विचारले. अजून कशावर हक्क सांगणार? मी सांगितले की बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाहीत. अनेक योजना सुरू केल्या, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम आम्ही केले. शासन आपल्या दारी ही योजना राबविली. अनेक योजनांद्वारे सर्वसामान्यांचे भले कसे होईल हे आम्ही पाहिले. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, असा पुनरुच्चार शिंदे यांनी केला.
advertisement
मराठवाड्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे
मराठवाड्यावर अतिवृष्टीरुपी संकट कोसळले. राज्य सरकारबरोबर केंद्र सरकार मदत देणार आहे. आम्ही मोदी आणि शाह यांना मदतीची विनंती केली. त्यांनी सांगितले अजिबात चिंता करू नका. आम्ही महाराष्ट्राच्या मागे खंबीर उभे असल्याचे केंद्राने सांगितल्याचे शिंदे म्हणाले.
ठाकरेंवर टोलेबाजी
ठाकरे जेव्हा पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी आले तेव्हा त्यांनी एखादा बिस्किट पुडा आणला होता का? चेक न देता निघून गेले. बाळासाहेबांनी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हा गुरुमंत्र आपल्या दिला आहे. मात्र (ठाकरेना उद्देशून) त्यांच्याकडे १०० टक्के राजकारण सुरू आहे, अशी टोलेबाजी शिंदे यांनी केली.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 10, 2025 7:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
२० हजार मतदान बाहेरून आणलं, आमदार भुमरे यांची अजब कबुली, एकनाथ शिंदेंनी डोळे वटारताच...