IRCTC वर दुसऱ्याचं तिकीट बूक केलं तर होईल जेल? अखेर आयआरसीटीसीने केला खुलासा
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
तुमच्या आयआरसीटीसी खात्यावरुन तुम्ही दुसऱ्या कुणाचं तिकीट बुक केलं तर तुम्हाला कारावास होईल ही ‘शुद्ध अफवा’ असल्याचं आयआरसीटीसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
मुंबई: रेल्वे देशभर पसरलेल्या जाळ्यासाठी आणि सर्वच स्तरांतील प्रवाशांना परवडेल अशा प्रवासासाठी जगभर ओळखली जाते. भारतासारख्या विस्तीर्ण देशात तर तिचं महत्त्व जास्तच आहे. प्रवाशांच्या सोयीसुविधांचा काळजीपूर्वक विचार केला तर रेल्वे फक्त सोयीचीच नाही तर जिव्हाळ्याचीही ठरते. असं असलं तरी रेल्वेच्या प्रवासात प्रवाशांकडून नियमांचं उल्लंघन होत असेल तर रेल्वे कडक शिक्षाही ठोठावते. त्यामुळेच रेल्वेने केलेले नियम सहसा प्रवाशांकडून गांभीर्याने घेतले जातात. आयआरसीटीसीच्या बुकिंग आयडीवरुन एखाद्या प्रवाशाने इतर कोणासाठी तिकीट बुक केलं तर कारावास होतो अशी एक चर्चा सध्या सुरु आहे, मात्र आयआरसीटीसी कडून त्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
तुमच्या आयआरसीटीसी खात्यावरुन तुम्ही दुसऱ्या कुणाचं तिकीट बुक केलं तर तुम्हाला कारावास होईल ही ‘शुद्ध अफवा’ असल्याचं आयआरसीटीसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ही चर्चा आणि वृत्त निराधार असल्याचं आयआरसीटीसीने सांगितलं आहे. अशा खोडसाळ वृत्तांना थारा देऊ नये असं आवाहनही रेल्वेकडून करण्यात आलं आहे. आयआरसीटीसी वेबसाइटवर तिकिटांचं बुकिंग रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच केलं जात असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे.
advertisement
अलीकडेच सोशल मीडियावर अशा पोस्ट व्हायरल होत होत्या. एका आडनावाची व्यक्ती आपल्या आयआरसीटीसी खात्यावरुन इतर आडनावाच्या व्यक्तीसाठी तिकीट बुक करु शकत नाही. तसं केलं तर बुक करणाऱ्या व्यक्तीला कारावासाची शिक्षा होऊ शकते असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं. ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाल्यामुळे आयआरसीटीसीने ‘एक्स’ वरुन स्पष्टीकरण दिलं आहे.
advertisement
‘सोशल मीडियावरील चर्चाही संपूर्ण निराधार आहे. एका आडनावाच्या व्यक्तीने आपल्या खात्यावरुन इतर कुणाचं तिकीट बुक केल्यास रेल्वे किंवा आयआरसीटीसी कोणतीही कारवाई करत नाही किंवा बुकिंग करणाऱ्याला शिक्षाही होत नाही’ असं आयआरसीटीसीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ‘तुमच्या आयआरसीटीसी खात्यावरुन मित्र, नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्ही तिकीट बुक करु शकता. एक युझर महिन्याला 12 तिकिटं काढू शकतो. आधार कार्डाद्वारे व्हेरिफाय केलेला युझर एका महिन्यात 24 तिकिटं काढू शकतो,’ असंही आयआरसीटीसी आणि रेल्वे बोर्डाने या निमित्ताने स्पष्ट केलं आहे. रेल्वे बोर्डाच्या प्रवक्त्यांकडूनही सोशल मीडियावरील चर्चा अफवा असल्याचं सांगितलं आहे. मात्र, पर्सनल युझर आयडीचा वापर करुन बुक केलेली तिकिटं विकता येत नाहीत. अशी विक्री करणं हा गुन्हा आहे. कोणी हे कृत्य करत असल्यास रेल्वे ॲक्ट 1989 च्या कलम 143 खाली कारवाई होऊ शकते असंही या निमित्ताने रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 26, 2024 11:58 PM IST


