सांगलीच्या आप्पांचा विषय लय हार्ड! वयाच्या सत्तरीत सुरु केला आटा निमिर्ती व्यवसाय, गाजवतायत मार्केटच मैदान
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
सांगली जिल्ह्यात रेणावी येथील बाळकृष्ण यादव यांनी वयाच्या सत्तराव्या वर्षी अन्नप्रक्रिया उद्योगात पदार्पण केले. दोन्ही मुलांच्या मदतीने त्यांनी माउली फूड्स या ब्रँडद्वारे चक्की फ्रेश आटा स्टार्ट अप उभारले आहे.
प्रीती निकम, प्रतिनिधी
सांगली : दुष्काळ, शेती, राजकारण या सगळ्याशी झुंज देत सांगलीच्या खानापूर तालुक्यातील रेणावी गावच्या आप्पांनी वयाच्या सत्तरीत नवं स्टार्ट अप सुरू केलंय. आयुष्यभराचे अनुभव, अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर दोन्ही मुलांना हाताशी घेत सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगातून 30 लाखांचा कर्ज प्रकल्प करत आटा चक्कीचा व्यवसाय सुरू केला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून आटा चक्की कशी चालते अन् सत्तर वर्षीय आप्पांनी मार्केटचे मैदान कसे गाजवले जाणून घेऊ.
advertisement
रेणावी गावातील बाळकृष्ण पांडुरंग यादव हे 70 वर्षे वयाचे शेतकरी आहेत. डोंगरी भागामध्ये असणाऱ्या गावात त्यांची सुमारे 10 एकर शेती आहे. दुष्काळाशी झुंज देत त्यांनी द्राक्ष बागा तसेच केळी बागा देखील पिकवल्या दोन-तीन वर्ष चांगले पीक घेत. पण पुन्हा दुष्काळ पडला की पुन्हा नुकसान सोसावे लागत. अशातही त्यांनी अनेक वर्ष शेती पिकवत पशुपालनामध्ये देखील जम बसवला. मात्र सामाजिक प्रतिष्ठा आणि राजकारणाच्या नादात मुलांच्या शिक्षणाचे नुकसान झाले. आत्मपरीक्षण करत बाळकृष्ण यादव उर्फ आप्पा यांनी शेती पशुपालन सूतगिरणी व्यवसाय करत पुन्हा कुटुंबाकडे लक्ष दिले.
advertisement
संकटाने दाखविला मार्ग
बाळकृष्ण यांची मुले प्रशांत आणि प्रसाद यांनाही संघर्षाला तोंड द्यावे लागले. सूतगिरणी उभारली. पण त्यातही अपयश आले. कर्ज झाले. त्यातून मार्ग काढण्यासाठी धावपळ सुरू झाली. कोरोना आला त्यात सूतगिरणी पूर्णपणेच बंद केली. आता कुडुंबाने उदरनिर्वाहाचा ठोस पर्याय शोधण्यास सुरुवात केली.
advertisement
कोरोनाने शिकवले
कोरोना काळात एक गोष्ट समजली ती म्हणजे बाकी सर्व व्यवसाय, गोष्टी या काळात ठप्प होतात. पण जोती, अन्नपदार्थ निर्मिती व त्यांची मागणी थांबू शकत नाही. त्या विचारातूनच अन्न प्रक्रिया व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. विविध माहिती स्रोत, युट्यूब आदींच्या माध्यमातून व्यवसायाचा शोध सुरू केला. अनेक पर्यायांपैकी तुलनेने कमी खर्चात करण्याजोगा असा गव्हापासून आटा निर्मितीचा प्रकल्प रास्त वाटला.
advertisement
सुरू केला स्टार्ट अप
प्रक्रिया उद्योगाला लागणारा कच्चा माल, त्याची उपलब्धता, बाजारपेठेतील दर आदी बाबींचा अभ्यास केला. त्यासाठी मध्यप्रदेश,पंजाब या ठिकाणी गव्हाच्या बाजारपेठांना भेटी दिल्या. पंतप्रधान अन्नप्रक्रिया उद्योग योजनेची माहिती मिळाली. प्रकल्पाची किंमत 30 लाखांची होती.
त्यासाठी 35 टक्के अनुदान मिळण्यासाठी व प्रशिक्षण देण्यासाठीही केंद्र सरकारच्या आत्मा विभागाने मदत केली. भांडवल उपलब्ध झाल्यानंतर आवश्यक यंत्र राजकोट येथून खरेदी केली. विटा शहरापासून सुमारे पाच किलोमीटरवरील घाणवड येथील औद्योगिक वसाहतीत जागा भाडेतत्वावर घेतली. तेथे माउली फूड्स नावाने प्रक्रिया उद्योगाचा स्टार्ट अप 2022-23 या काळात सुरू केला.
advertisement
व्यवसायाचा आलेख वाढता
बाळकृष्ण यांचा स्वभाव बोलका असल्याने आपण उत्पादनाचे मार्केटिंग चांगल्या प्रकारे करू शकतो असा आत्मविश्वास होता. ते विविधि दुकानांमध्ये आपला आटा घेऊन जायचे, त्याची वैशिष्ट्ये, गुणवत्ता विक्रेत्यांना समजावून सांगायचे. विक्रेते एक बॅग ठेवून जा असे सांगत. हळूहळू गुणवत्ता लक्षात येऊ लागल्यानंतर त्यांच्याकडून मागणी येऊ लागली. त्यानुसार मार्केट तयार करण्यास बाळकृष्ण यांनी सुरुवात केली. आता परिसरातील ग्राहक देखील जागेवर येऊन खरेदी करतात. सन 2022-23 मध्ये 50 टन, 2023-24 मध्ये 300 टन, तर 2024-25 मध्ये आतापर्यत 400 टन विक्री करण्यापर्यत व्यवसायाचा आलेख चढता राहिला आहे.
advertisement
आयुष्यभराचे बरेच अनुभव गाठीशी असणारे आप्पा नव्या तंत्रज्ञानाशी देखील मैत्री करत आहेत. व्यवसायातील प्रामाणिकपणा आणि मार्केट अभ्यासाच्या जोरावर बाळकृष्ण यादव आणि त्यांची मुलं स्टार्टअप विस्तारित करू पाहत आहेत. वयाच्या सत्तरीत असणारा आप्पांचा व्यवस्थापनातील उत्साह नवं उद्योजकांना देखिल प्रेरणादायी ठरतो आहे.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
February 10, 2025 10:47 AM IST
मराठी बातम्या/मनी/
सांगलीच्या आप्पांचा विषय लय हार्ड! वयाच्या सत्तरीत सुरु केला आटा निमिर्ती व्यवसाय, गाजवतायत मार्केटच मैदान

