BMC Election Result : मुंबईत एमआयएमच्या 8 जागांनी गेम फिरला, ओवेसींनी कुणाचा 'करेक्ट कार्यक्रम' केला? Inside Story
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना महायुतीने बहुमताचा आकडा गाठला आहे, पण या निवडणुकीमध्ये एमआयएमला मिळालेलं यश चर्चेचा विषय ठरत आहे.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांचा निकाल लागला असून भाजप हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे, पण असं असलं तरी भाजपला महापौर बनवण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मदत घ्यावी लागणार आहे. मुंबईतल्या 227 जागांपैकी भाजप 89, शिवसेना 29 जागांवर विजयी झाली. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65, काँग्रेसला 25, एमआयएमला 8, मनसेला 6, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3, समाजवादी पक्षाला 2 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एका जागेवर विजय मिळाला.
मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना महायुतीने बहुमताचा आकडा गाठला आहे, पण या निवडणुकीमध्ये एमआयएमला मिळालेलं यश चर्चेचा विषय ठरत आहे. एमआयएमला मिळालेल्या या 8 जागा मुंबईच्या पूर्व उपनगरातील आहेत, त्यामुळे इथली राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. एमआयएमला मिळालेल्या या यशामुळे मुंबईमधील समाजवादी पक्षाला मात्र मोठा धक्का बसला आहे.
एमआयएम विजयाची कारणं
advertisement
मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये एमआयएमला मुस्लिम मतांचं संघटन करण्यात यश आलं, तसंच मुंबईमध्ये ओवेसी बंधूंची सभाही पार पडली. याशिवाय एमआयएमने मुंबईमध्ये तरुण आणि सुरक्षित उमेदवार मैदानात उतरवले होते.
मुंबईमधील 134, 135, 136, 137, 138, 139, 140, 141, 143 आणि 145 या 10 मतदारसंघांमध्ये एमआयएमने मोठ्या प्रमाणावर मतं घेतली. या प्रभागांमध्ये एमआयएम उमेदवार शिक्षण, आरोग्य, भ्रष्टाचार आणि नशेच्या आहारी गेलेली तरुण पिढी असे अराजकीय मुद्दे घेऊन मैदानात उतरले होते, ज्याचा त्यांना फायदा झाला. प्रभाग क्रमांक 136 मध्ये एमआयएम उमेदवार जमीर कुरेशी यांचा तब्बल 9,923 मतांनी विजय झाला आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या कुरेशी यांना 14,921 मतं मिळाली तर सपाच्या माजी नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांना फक्त 4,998 मतांवर समाधान मानावं लागलं.
advertisement
मागच्या निवडणुकीपर्यंत पूर्व उपनगरांमधली मुस्लिम मतं ही समाजवादी पक्षाची व्होट बँक होती, पण आता एमआयएमने समाजवादी पक्षाच्या बालेकिल्ल्यातच मुसंडी मारली आहे. पूर्व उपनगरामधील प्रभाग क्रमांक 137 मध्ये सपाच्या माजी नगरसेविका आयेशा शेख आणि प्रभाग क्रमांक 139 मधील माजी नगरसेवक अख्तर कुरेशी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला, यानंतर स्थानिक मतदारांमध्ये नाराजी होती, तसंच इच्छुकांना उमेदवारी न दिल्यामुळे नाराजीही पसरली होती, ज्याचा फायदाही एमआयएमला झाला.
advertisement
एमआयएमचे निवडून आलेले नगरसेवक
मेहजाबीन अतीक अहमद- प्रभाग क्रमांक 134
जमीर कुरेशी- प्रभाग क्रमांक 136
शमिर पटेल- प्रभाग क्रमांक 137
रोशन शेख- प्रभाग क्रमांक 138
शबाना शेख- प्रभाग क्रमांक 139
विजय उबाळे- प्रभाग क्रमांक 140
शबाना काजी- प्रभाग क्रमांक 143
खैरनुसा हुसेन- प्रभाग क्रमांक 145
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 5:14 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Election Result : मुंबईत एमआयएमच्या 8 जागांनी गेम फिरला, ओवेसींनी कुणाचा 'करेक्ट कार्यक्रम' केला? Inside Story









