Ranichi Baug: 3 दिवस, हजारो फुले अन् संगीताचा मेळ; राणीच्या बागेत अनोखा पुष्पोत्सव, पाहा कधी?
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Ranichi Baug: राणीच्या बागेत गेल्या 28 वर्षांपासून सातत्याने पुष्पोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यंदा हा उत्सव 29 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
मुंबई: भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) येत्या 6 ते 8 फेब्रुवारीदरम्यान भव्य पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा हा पुष्पोत्सव ‘संगीत’ या अनोख्या संकल्पनेवर आधारित असून फुलांच्या माध्यमातून संगीताची अनुभूती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या निमित्ताने मुंबईकरांना हजारो प्रजातींची रंगीबेरंगी फुले, विविध वनस्पती आणि फुलांनी सजवलेल्या आकर्षक प्रतिकृती पाहण्याची संधी मिळणार आहे.
निसर्गसंपन्न वारसा लाभलेल्या राणीच्या बागेत गेल्या 28 वर्षांपासून सातत्याने पुष्पोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यंदा हा उत्सव 29 व्या वर्षात पदार्पण करत असून दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित रचना सादर केल्या जातात. मागील वर्षी ‘राष्ट्रीय प्रतीके’ ही संकल्पना होती तर त्याआधी ‘अॅनिमल किंगडम’, ‘जलचर जीवन’, ‘आमची मुंबई’ आणि ‘कार्टून्स’ अशा विविध विषयांवर पुष्पोत्सव साजरा करण्यात आला होता.
advertisement
मुंबईकरांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करणे आणि निसर्गाशी नाते दृढ करणे हा या उत्सवामागील मुख्य उद्देश आहे. या पुष्पोत्सवात फुलझाडांच्या विविध प्रजाती, फळझाडांची रोपटी, औषधी वनस्पती तसेच आकर्षक सजावटीची झाडे पाहायला मिळणार आहेत. यासोबतच उद्यानविषयक साहित्य, सेंद्रिय खते, कुंड्या व लागवडीसाठी आवश्यक साहित्य विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
advertisement
या पुष्पोत्सवाची तयारी सुमारे तीन महिन्यांपूर्वीपासून सुरू करण्यात आली आहे. रोपांची लागवड, त्यांची निगा राखणे आणि ठरलेल्या संकल्पनेनुसार मांडणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
यंदाच्या पुष्पोत्सवाच्या निमित्ताने विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. मायक्रो ग्रीन्स, वनस्पती संवर्धन (प्रोपागेशन), बोन्साय, अक्वास्केपिंग, सेंद्रिय खतनिर्मिती, झाडांची देखभाल तसेच कलात्मक पुष्परचना अशा विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यापूर्वी जपान, मलेशिया, कॅनडा व मॉरिशस येथील राजदूतांसह अनेक मान्यवरांनी या पुष्पोत्सवाला भेट दिली आहे.
advertisement
निसर्गप्रेमींसाठी हा पुष्पोत्सव एक अविस्मरणीय अनुभव ठरणार असून मुंबईकरांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 1:40 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Ranichi Baug: 3 दिवस, हजारो फुले अन् संगीताचा मेळ; राणीच्या बागेत अनोखा पुष्पोत्सव, पाहा कधी?







