Mumbai Fire : कांदीवलीत अग्नितांडव, आतापर्यंत 5 जणांचा जीव गेला, मृताचा आकडा वाढण्याची भीती
Last Updated:
Gas cylinder leakage fire incident in Kandivali Update : कांदिवलीतील भीषण आगीत मृतांची संख्या वाढली आहे. केटरिंग व्यवसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा पाचवर पोहोचला.
मुंबई : कांदिवली पूर्व येथे गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण गॅस गळती आणि आग प्रकरणात शिवानी केटरिंग सर्व्हिसेसच्या मालकीण शिवानी गांधी यांचा सोमवारी मृत्यू झाला. नॅशनल बर्न्स सेंटर, ऐरोली येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. 90 टक्क्यांहून अधिक भाजल्यानंतर, आठवडाभर जीव वाचवण्यासाठी झुंज देऊन अखेर त्यांचा अखेर मृत्यू झाला शिवाय या आगीत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत.
गांधी यांनी मागील 12 वर्षांपासून आपला केटरिंग व्यवसाय उभा केला होता. सुरुवातीला आकुर्ली येथील छोट्याश्या दुकानातून त्यांनी काम सुरू केले होते. मेहनतीमुळे व्यवसाय मोठा केला आणि काही आठवड्या आधीच त्यांनी आणखी एक दुकानाचा गाळा भाड्याने घेतले होता. स्थानिक घरमालक योगेंद्र मिस्त्री यांनी सांगितले की, गांधी आणि त्यांची टीम अत्यंत मेहनती होती. दुकानामुळे परिसरात नेहमीच चैतन्य असायचे. तक्रार कधी आली नाही, उलट ती सगळ्यांना मदत करणारी व्यक्ती होती, असे त्यांनी सांगितले.
advertisement
गांधींसोबत काम करणाऱ्या परमीला गुप्ता या कर्मचाऱ्याने भावनिक आठवण सांगितली. त्यांना कितीही मोठी ऑर्डर असली तरी शांतपणे काम पूर्ण करायच्या. माझे नशीब चांगले की त्या दिवशी मी उशिरा पोहोचले, त्यामुळे वाचले, असे ती म्हणाली.
या दुर्घटनेनंतर गांधींचे कुटुंब, नातेवाईक आणि मित्र हादरून गेले आहेत. तरीही त्यांनी एकत्र येऊन मदतीचा हात पुढे केला आहे. गांधींच्या मुलांना आणि उर्वरित पीडितांच्या कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा यासाठी निधी संकलन मोहिम हाती घेण्यात आली आहे. जमा झालेल्या निधीचा वापर रुग्णालयीन बिल भरण्यासाठी होणार असून, उरलेली रक्कम पीडितांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दिली जाईल.
advertisement
नॅशनल बर्न्स सेंटरचे संचालक डॉ. सुनील केसवानी यांनी सांगितले की, गांधी यांच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आणखी एका शस्त्रक्रियेची तयारी सुरू होती; मात्र प्रकृती खालावल्यामुळे ती पुढे ढकलावी लागली. आम्हाला वाटत होते की त्या बऱ्या होतील, पण दुर्दैवाने त्यांचे निधन झाले.
24 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली. काम सुरू असतानाच सिलिंडरमधून गॅस गळती झाली आणि अचानक आग भडकली. अर्ध्या तासात आग आटोक्यात आली; मात्र सात जण गंभीर भाजले. यात मालकीण शिवानी गांधींसह सहा कामगारांचा समावेश होता. आतापर्यंत नितू गुप्ता (३१), जानकी गुप्ता (३९), रक्षा जोशी (४७) आणि पूनम गौतम (२८) यांचा मृत्यू झाला आहे. दुर्गा गुप्ता (३०) यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे, तर मनराम कुमकट (५५) यांची प्रकृती सुधारत आहे.
advertisement
या दुर्घटनेने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, गांधींना ओळखणारे सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. त्यांच्या मदतीसाठी सुरु झालेल्या मोहिमेमुळे मात्र थोडी आशेची किरणे दिसत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 30, 2025 2:09 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Fire : कांदीवलीत अग्नितांडव, आतापर्यंत 5 जणांचा जीव गेला, मृताचा आकडा वाढण्याची भीती