Mumbai News: हातपाय बांधले अन् चोर समजून मरेपर्यंत मारलं, गोरेगावात तरुणासोबत भयानक घडलं, चौघांना अटक
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Mumbai News: चोर समजून गोरेगावात एका तरुणाला बेदम मारहाण केली. याप्रकरणात तरुणाचा मृत्यू झाला असून चौघांना अटक करण्यात आलीये.
मुंबई: ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ अशी म्हण आपल्याकडे आहे. असाच काहीसा प्रकार मुंबईतील गोरेगाव (प.) येथील तीनडोंगरी परिसरात घडली. चार कामगारांनी चोर समजून केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. हर्षल रामसिंग परमा (वय 26) असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी पहाटे 3 वाजल्यानंतर ही घटना घडली. या प्रकरणी सलमान खान, इसमुल्ला खान, गौतम चमार आणि राजीव गुप्ता या चौघा कामगारांना गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
हर्षल हा आपल्या आई सुवर्णा आणि वडील रामसिंग परमा यांच्यासह मोतीलाल नगर, गोरेगाव येथे राहत होता. शनिवारी रात्री तो दारू पिण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. पहाटेच्या सुमारास तो राज पॅथ्रोन इमारतीजवळ संशयास्पदपणे फिरताना दिसला. इमारतीत काम करणाऱ्या चार मजुरांना तो चोर असल्याचा गैरसमज झाला. त्यांनी त्याला पकडून इमारतीत नेले आणि हातपाय बांधून बांबूसह लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.
advertisement
या मारहाणीमध्ये हर्षल गंभीर जखमी झाला. काही वेळाने आरोपी तेथून पसार झाले. घटनेची माहिती इमारतीचा सुरक्षारक्षक पप्पू दूधनाथ यादव याने पोलिसांना दिली. गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हर्षलला ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी मृताच्या आई सुवर्णा परमा यांच्या तक्रारीवरून चारही कामगारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
advertisement
अटक करण्यात आलेले सर्व आरोपी राज पॅथ्रोन इमारतीत बांधकाम मजूर म्हणून कार्यरत होते. दिवसा काम करून ते इमारतीतच राहत असत. प्राथमिक चौकशीत त्यांनी हर्षलला चोर समजून मारहाण केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांना अटक करून बोरिवली येथील स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून फक्त संशयावरून झालेल्या या निर्दयी मारहाणीमुळे एका तरुणाचा बळी गेला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या मदतीने संपूर्ण घटनेचा तपशील उघड केला जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 24, 2025 12:00 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: हातपाय बांधले अन् चोर समजून मरेपर्यंत मारलं, गोरेगावात तरुणासोबत भयानक घडलं, चौघांना अटक


