Mumbai News : फक्त 12 रुपयांच्या गॅस बिलासाठी मोजावे लागले 54 हजार; मुंबईत ज्येष्ठ नागरिकाची मोठी फसवणूक
Last Updated:
Gas Bill Fraud : खार पश्चिम परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाची फसव्या गॅस बिल अॅपद्वारे 54,500 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. अज्ञात भामट्यांविरोधात खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई : मुंबईतील खार पश्चिम परिसरात सायबर फसवणुकीची आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे. टीपीएस तीन भागात राहणारे 70 वर्षीय श्रीचंद मंगलाणी यांना भामट्यांनी गॅस बिलाच्या नावाखाली गंडा घातला.नेमका हा प्रकार कसा घडला याबाबत जाणून घेऊयात.
गॅस बिल बाकी असल्याचं सांगून गंडा
मिळालेल्या माहितीनुसार, 15 जानेवारी रोजी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना मोबाइलवर फोन करून तुमचे गॅस बिल केवळ 12 रुपये थकीत असल्याचे सांगितले. बिल भरण्यासाठी तात्काळ कारवाई न केल्यास गॅस कनेक्शन बंद होईल, अशी भीतीही त्यांना दाखवण्यात आली.
यानंतर संबंधित व्यक्तीने महानगर गॅस बिल ऑनलाइन अॅप नावाची एक फाईल त्यांच्या मोबाइलवर पाठवली. वरिष्ठ नागरिक असल्याने आणि अधिक माहिती नसल्याने श्रीचंद मंगलाणी यांनी विश्वास ठेवून ती फाईल उघडली आणि सांगितलेल्या सूचनांनुसार प्रक्रिया पूर्ण केली. मात्र ही फाईल फसवी असल्याचे नंतर उघड झाले.
advertisement
फाईल उघडताच त्यांच्या बँक खात्यातून कोणतीही कल्पना न देता 54 हजार 500 रुपयांची रक्कम परस्पर काढून घेण्यात आली. खात्यातील पैसे कमी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने बँकेशी संपर्क साधला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेनंतर श्रीचंद मंगलाणी यांनी खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी नागरिकांना अनोळखी कॉल, लिंक किंवा अॅप्सबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले असून कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी खातरजमा करण्याचा सल्ला दिला आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 12:19 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : फक्त 12 रुपयांच्या गॅस बिलासाठी मोजावे लागले 54 हजार; मुंबईत ज्येष्ठ नागरिकाची मोठी फसवणूक







