Mumbai : क्लासवरून घरी परतणाऱ्या मुलीला अज्ञात व्यक्तीने गाठलं अन् भररस्त्यातच...; साकीनाकामधील हादरवणारी घटना
Last Updated:
SakiNaka Shocking News : साकिनाका परिसरात भररस्त्यात 15 वर्षीय मुलीचा अज्ञात व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून गैरवर्तनाचा प्रयत्न केला.
मुंबई : साकिनाका परिसरात भरदिवसा घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रस्त्यावरून घरी जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा अज्ञात व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी साकिनाका पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात विनयभंगासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी तपासाला वेग देण्यात आला आहे.
मुलीला अज्ञात व्यक्तीने गाठलं
पीडित मुलगी साकिनाका परिसरात आपल्या कुटुंबासह राहते. ती अवघ्या 15 वर्षांची असून 12 जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास क्लास संपवून घरी परतत होती. याच वेळी एक अज्ञात व्यक्ती अचानक तिच्या जवळ आला. त्याने भररस्त्यात तिचा हात धरत तिला अडवले आणि मोबाईल फोनवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला.
advertisement
हा प्रकार इतका अचानक घडल्याने मुलगी प्रचंड घाबरली. तिने प्रसंगावधान राखत आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली आणि थेट घरी धाव घेतली. या घटनेनंतर ती घाबरलेली होती पण शेवटी कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर मंगळवारी तिने साकिनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून आरोपीची ओळख पटवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून आरोपी लवकरच ताब्यात घेतला जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 8:50 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : क्लासवरून घरी परतणाऱ्या मुलीला अज्ञात व्यक्तीने गाठलं अन् भररस्त्यातच...; साकीनाकामधील हादरवणारी घटना









