Traffic Jam: आठवड्याच्या सुरुवातीलाच सर्वात मोठा ट्रॅफिक जाम, 5 किमीपर्यंत लांब रांगा, गाड्याही अडकल्या
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
प्रजासत्ताक दिनाच्या परेड तालीममुळे दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली, विजय चौक ते इंडिया गेट मार्ग बंद, पोलिसांनी पर्यायी मार्ग व मेट्रो वापरण्याचा सल्ला दिला.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडची तालीम आणि वाहतूक पोलिसांनी घातलेले निर्बंध यामुळे आज दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. पांडव नगरपासून सराई काले खानपर्यंत सुमारे ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सोमवारी सकाळच्या घाईच्या वेळीच ही कोंडी झाल्याने कार्यालयांत जाणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांचा खोळंबा झाला असून वाहने रस्त्यावरच ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लेटमार्क लागणार आहे.
नेमकं कारण काय?
१९ जानेवारीपासून प्रजासत्ताक दिनाच्या परेडची मुख्य तालीम सुरू झाली आहे. विजय चौक ते इंडिया गेट आणि कार्तव्य पथ या परिसरात सकाळी १०:०० ते दुपारी १२:३० या वेळेत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. विजय चौकाकडून इंडिया गेटकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याने त्याचा ताण पर्यायी मार्गांवर आणि प्रामुख्याने दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर पडला आहे.
advertisement
'नो टॉलरन्स झोन'मध्येही अडकली चाकं
दिल्ली वाहतूक पोलिसांनी शहरातील ६ महत्त्वाची ठिकाणे 'झिरो टॉलरन्स झोन' म्हणून घोषित केली आहेत. आनंद विहार बसस्थानकासारख्या भागात बेकायदेशीर पार्किंग आणि रिक्षांच्या गर्दीमुळे होणारी कोंडी फोडण्यासाठी पोलीस तैनात आहेत. मात्र, परेड रिहर्सलमुळे मध्य दिल्लीतील वाहतूक वळवण्यात आल्याने पूर्व दिल्लीतील मार्गांवर प्रचंड ताण आला आहे.
वाहनचालकांनो, हे मार्ग टाळा!
वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या 'ट्रॅफिक अॅडव्हायझरी'नुसार, २१ जानेवारीपर्यंत सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत विजय चौक, कार्तव्य पथ आणि इंडिया गेट परिसरातील रस्ते टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याऐवजी प्रवाशांनी मेट्रोचा वापर करावा किंवा पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
Jan 19, 2026 11:07 AM IST
मराठी बातम्या/देश/
Traffic Jam: आठवड्याच्या सुरुवातीलाच सर्वात मोठा ट्रॅफिक जाम, 5 किमीपर्यंत लांब रांगा, गाड्याही अडकल्या









