'मला सगळ्याचा कंटाळा आलाय, आता बस्स वाटतंय'; मृत्यूच्या ५ दिवस आधी अजित पवार असं का म्हणाले? जवळच्या मित्रानं सांगितली दादांच्या मनातील ती सल
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
ते वारंवार एकच गोष्ट बोलत होते— "बास झालं आता, मला या गोष्टींचा खूप त्रास होतोय." सत्तेच्या राजकारणात कायम सक्रिय राहणारा हा नेता अचानक असा का बोलतोय, हे कोणालाच उमजलं नव्हतं.
बारामती: कणखर बाणा, कडक शिस्त आणि कामाचा अवाढव्य उरक असलेले 'दादा' अशी महाराष्ट्राला अजित पवारांची ओळख आहे. मात्र, बारामतीच्या त्या भीषण अपघाताच्या पाच दिवस आधी दादांच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं. "मला आता या सगळ्याचा कंटाळा आलाय, आता बस्स वाटतंय," अशा भावना त्यांनी आपले अत्यंत जवळचे स्नेही आणि विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्याकडे व्यक्त केल्या होत्या. दादांच्या निधनानंतर गुजर यांनी व्यक्त केलेली ही आठवण आता सर्वांचे डोळे पाणावणारी ठरली आहे.
तो अर्धा दिवस आणि शेवटचं जेवण
किरण गुजर यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, पाच दिवसांपूर्वी दादा खूप विचलित होते. ते मला म्हणाले, "किरण, खूप कंटाळा आलाय, आपण दोघे जरा बाहेर जाऊया." आम्ही दोघे अर्धा दिवस बाहेर फिरलो, एकत्र जेवलो. तेच माझं दादांसोबतचं शेवटचं जेवण ठरलं. त्यावेळी ते वारंवार एकच गोष्ट बोलत होते— "बास झालं आता, मला या गोष्टींचा खूप त्रास होतोय." सत्तेच्या राजकारणात कायम सक्रिय राहणारा हा नेता अचानक असा का बोलतोय, हे कोणालाच उमजलं नव्हतं.
advertisement
"मी कोणाचं वाईट केलं?" – मनातील ती सल
लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर बारामतीमध्ये झालेली टीका अजित पवारांच्या मनाला कुठेतरी खोलवर लागली होती. किरण गुजर यांच्या मते, "दादा अत्यंत हळव्या मनाचे होते. ते विचारायचे, मी रात्रंदिवस मरमर काम करतोय, तरी माझ्या वाट्याला गालबोट का लागतंय? बारामतीत लोक माझ्यावर टीका का करतात? मी कोणाचं काय वाईट केलंय?" विधानसभा निवडणुकीतही ते उभे राहायला तयार नव्हते, त्यांना खूप समजावून तयार करावं लागलं होतं.
advertisement
नास्तिकतेकडून श्रद्धेकडे झालेला प्रवास
अजित पवारांच्या सुरुवातीच्या काळात देवाबद्दलचे विचार वेगळे होते. "लहानपणी वडील गेले, कुटुंबावर वाईट परिस्थिती आली, देवानं माझं काय केलं?" असा प्रश्न ते लहानपणी विचारायचे. मात्र, अनुभवाने ते बदलले. देवाबद्दल त्यांच्या मनात श्रद्धा निर्माण झाली होती, पण ती अंधश्रद्धा नव्हती. श्रद्धेचा वापर त्यांनी कधीही राजकारणासाठी केला नाही, असेही गुजर यांनी स्पष्ट केले.
advertisement
डोळ्यांसमोर काळाचा घाला!
सर्वात भयानक अनुभव म्हणजे, अपघाताच्या काही मिनिटे आधी दादांनी गुजर यांना फोन केला होता. "मी विमानात बसतोय," हे त्यांचे शेवटचे शब्द ठरले. गुजर त्यांना घेण्यासाठी विमानतळावर गेले होते आणि त्यांच्या डोळ्यांसमोरच विमानाचा अपघात झाला. "गाडीत मृतदेह ठेवताना मी ओळखलं की हे दादाच आहेत. मला वाटलं काहीतरी वाईट स्वप्न पडतंय, पण ते वास्तव होतं," असे सांगताना गुजर यांना अश्रू अनावर झाले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 10:45 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
'मला सगळ्याचा कंटाळा आलाय, आता बस्स वाटतंय'; मृत्यूच्या ५ दिवस आधी अजित पवार असं का म्हणाले? जवळच्या मित्रानं सांगितली दादांच्या मनातील ती सल







