बारामतीत भरदिवसा खळबळजनक घटना; गाडी आडवी लावून स्कूटीवरील महिलेला रस्त्यात थांबवलं, मग...
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीने तत्काळ त्यांच्या स्कूटीची चावी काढून घेतली आणि सीटवर धारदार शस्त्राने वार केला
बारामती : बारामती औद्योगिक वसाहत परिसरातून निघालेल्या एका महिलेला भर दुपारी धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मंगळवारी (2 डिसेंबर) दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात दुचाकीस्वारांनी रस्त्यात दुचाकी आडवी लावून हा दरोडा टाकला आणि महिलेकडील ४१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला.
बारामती तालुका पोलीस ठाण्यात रुई येथील रहिवासी रूपाली किशोर रूपनवर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली रूपनवर यांची वंजारवाडीतील जगदंबानगर परिसरात 'तन्वी फूड्स' नावाची कंपनी आहे. मंगळवारी दुपारी त्या स्कूटीवरून कंपनीतून निघाल्या होत्या. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील वंजारवाडी येथील पुलाजवळ त्या पोहोचल्या असताना, त्यांच्या मागून आलेल्या दोघा अज्ञात दुचाकीस्वारांनी आपली दुचाकी रूपालीच्या स्कूटीसमोर आडवी लावली आणि त्यांना थांबायला भाग पाडलं.
advertisement
मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीने तत्काळ त्यांच्या स्कूटीची चावी काढून घेतली आणि सीटवर धारदार शस्त्राने वार केला. यानंतर त्याने रूपालीला धमकी दिली की, सोन्याच्या बांगड्या आणि अंगठी न दिल्यास जीवे मारू. या जीवघेण्या धमकीमुळे रूपाली रूपनवर पूर्णपणे घाबरल्या. त्यांनी कोणताही विरोध न करता आपल्या हातातील ३८ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या आणि २७ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून चोरट्यांच्या हवाली केली.
advertisement
या घटनेत चोरट्यांनी एकूण ३ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. चोरी केल्यानंतर दोन्ही अज्ञात आरोपी पालखी महामार्गावरून पाटसच्या दिशेने वेगाने निघून गेले. भर दुपारी पालखी महामार्गावर घडलेल्या या घटनेमुळे बारामती परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, बारामती तालुका पोलीस या अज्ञात चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 06, 2025 2:10 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
बारामतीत भरदिवसा खळबळजनक घटना; गाडी आडवी लावून स्कूटीवरील महिलेला रस्त्यात थांबवलं, मग...


