Pooja Khedkarला UPSC नंतर न्यायालयाचाही दणका, अटक होण्याची शक्यता
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
पटियाला हाऊस कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या असून तिला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
दिल्ली : पूजा खेडकर ही आयएएस प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असताना तिच्या वर्तनामुळे वादात अडकली. यानंतर तिच्यावर अनेक गंभीर आरोप झाले. या आरोपानंतर युपीएससीने तिची उमेदवारी रद्द केली. तिला पुढील परीक्षांना बसण्यास अपात्र ठरवलं. युपीएससीने केलेल्या कारवाईनंतर आता पटियाला हाऊस कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या असून तिला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
सीएसई २०२२ च्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर पूजा खेडकरची प्रशिक्षणार्थी आयएएस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र पुण्यात तिने ऑडी कारवर अंबर दिवा लावल्याने आणि वरिष्ठांची केबिन बळकावल्याचे आरोप झाले. यानंतर तिच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरूनही गंभीर आरोप केले गेले. तसंच मर्यादेपेक्षा जास्त वेळा युपीएससी परीक्षा देण्यासाठी नावामध्ये बदल करून फसवणूक केल्याचाही आरोप झाला. या आरोपानंतर तिचं प्रशिक्षण स्थगित करण्यात आलं होतं. युपीएससीने तिच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हाही दाखल झाला होता.
advertisement
दरम्यान, पूजाने दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात धाव घेत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर बुधवारी सुनावणी झाली होती. आज गुरुवारी न्यायालयाने निर्णय देताना तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला. यामुळे पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या आहेत. तिला २३ जुलैपर्यंत मसूरीतील प्रशिक्षण अकादमीत हजर राहण्याचे आदेश दिले होते. ती तिथेही हजर झालेली नाही. पुणे पोलीससुद्धा तिचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप तिचा शोध लागला नाहीय. आता पटियाला हाऊस कोर्टाने जामीन फेटाळल्यानं तिला अटक होऊ शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 01, 2024 4:47 PM IST










