पुण्यात बापाचाच मुलावर गोळीबाराचा कट! पिस्तूल पुरवणारा आरोपी अटकेत; 75 लाखांच्या सुपारी प्रकरणाचा गुंता सुटला
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
जंगली महाराज (JM) रस्ता परिसरात एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबाराचा प्रयत्न झाला होता. सुदैवाने पिस्तूलमधून गोळी न सुटल्याने त्या तरुणाचा जीव वाचला
पुणे: कौटुंबिक वादातून पोटच्या मुलाची हत्या करण्यासाठी ७५ लाखांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला होता. या हाय-प्रोफाईल गुन्ह्यात वापरण्यासाठी पिस्तूल पुरवणारा सराईत गुन्हेगार आता पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. नीलेश श्रीकांत गायकवाड (वय २४, रा. पिसोळी) याला खंडणीविरोधी पथकाने पिसोळी परिसरातून अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो पोलिसांना हुलकावणी देत होता.
नेमकी घटना काय?
गेल्या वर्षी १६ एप्रिल २०२४ रोजी जंगली महाराज (JM) रस्ता परिसरात एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबाराचा प्रयत्न झाला होता. सुदैवाने पिस्तूलमधून गोळी न सुटल्याने त्या तरुणाचा जीव वाचला. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. यावेळी खुद्द वडिलांनीच मालमत्ता आणि कौटुंबिक वादातून मुलाचा काटा काढण्यासाठी ७५ लाखांची सुपारी दिल्याचे उघड झाले होते.
advertisement
'मकोका' अंतर्गत कारवाई अन् आरोपीचा पाठलाग
या गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्यांवर पोलिसांनी 'मकोका' (MCOCA) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. या गुन्ह्यात हल्लेखोरांना पिस्तूल पुरवणारा नीलेश गायकवाड हा तेव्हापासून फरार होता. खंडणीविरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी पिसोळी भागात गस्त घालत असताना, पोलीस कर्मचारी नितीन मुंढे यांना माहिती मिळाली की, गायकवाड हा आपल्या आईला भेटण्यासाठी पिसोळी परिसरात येणार आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने तात्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणात यापूर्वीच मुख्य सूत्रधार असलेल्या बांधकाम व्यावसायिकासह इतर हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. नीलेश गायकवाडच्या अटकेमुळे या गुन्ह्यातील शस्त्रांच्या पुरवठ्याची साखळी पूर्णपणे उघड झाली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 02, 2026 9:46 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात बापाचाच मुलावर गोळीबाराचा कट! पिस्तूल पुरवणारा आरोपी अटकेत; 75 लाखांच्या सुपारी प्रकरणाचा गुंता सुटला










