Pune Bus Service : प्रवाशांनो लक्ष द्या! शिवाजीनगर ते छत्रपती संभाजीनगर दर अर्ध्या तासाला ई-बस सेवा; जाणून घ्या वेळापत्रक
Last Updated:
Shivajinagar To Chhatrapati Sambhajinagar Bus : शिवाजीनगर (वाकडेवाडी) येथून छत्रपती संभाजीनगरकडे दर अर्ध्या तासाला वातानुकुलित ई-बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
पुणे : पुणेकरांसाठी आणि मराठवाडा दौऱ्यावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी सोय निर्माण झाली आहे. एसटी महामंडळाच्या पुणे विभागाने आता शिवाजीनगर बसस्थानकावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला वातानुकुलित ई-बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना आरामदायी, सुरक्षित आणि वेळेत पोहचवणारी प्रवास सुविधा मिळणार आहे.
ही बस सेवा दररोज पहाटे 5 वाजून 15 मिनिटांपासून सुरू होईल आणि रात्री 9 वाजून 15 मिनिटांपर्यंत सुरू राहील. यामध्ये प्रत्येक अर्ध्या तासाला एक नवी ई-बस सुटणार असून, यामुळे प्रवाशांना वारंवार गाड्या पकडण्याची चिंता उरणार नाही. गर्दीच्या वेळेत प्रवाशांना उभे राहावे लागू नये,प्रवास आरामदायी व्हावा आणि प्रवासात वेळ वाचावा या उद्देशाने ही नवी सुविधा राबवण्यात आली आहे.
advertisement
या बसमध्ये अत्याधुनिक सुविधा असून प्रवाशांसाठी वातानुकूलित आसनव्यवस्था, आरामदायी सीट्स, मोबाइल चार्जिंगसाठी पोर्ट आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ई-बस सेवेवर विशेष भर दिल्यामुळे इंधन बचत, प्रदूषण कमी करणे आणि प्रवाशांना आधुनिक सुविधा देणे या तिन्ही गोष्टी साध्य होणार आहेत.
याशिवाय प्रवाशांसाठी सोयीसाठी ऑनलाइन आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिकृत संकेतस्थळावर बसची वेळ,तिकिटे आणि आसन उपलब्धतेबाबत सर्व माहिती मिळू शकते. त्यामुळे तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. प्रवासी मोबाईलवरून सहजपणे आरक्षण करू शकतात आणि निश्चित वेळेनुसार प्रवास सुरू करू शकतात.
advertisement
पुणे विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी माहिती देताना सांगितले की,शिवाजीनगर–छत्रपती संभाजीनगर या दरम्यान ई-बसची सुविधा प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. या निर्णयामुळे पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यांदरम्यान व्यावसायिक, विद्यार्थी, नोकरदार आणि कुटुंबासह प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्ध्या तासाला नियमित बस सुटत असल्याने कोणत्याही वेळी सहज उपलब्धता राहणार आहे. यामुळे या मार्गावरील प्रवास केवळ सोयीस्करच नव्हे तर पर्यावरणपूरकही ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 13, 2025 2:11 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Bus Service : प्रवाशांनो लक्ष द्या! शिवाजीनगर ते छत्रपती संभाजीनगर दर अर्ध्या तासाला ई-बस सेवा; जाणून घ्या वेळापत्रक