छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त 68 शब्दांत, CBSE पॅटर्नवर अभ्यासकांचा आक्षेप, Video
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
CBSE Pattern: राज्य सरकारने येत्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई पॅटर्न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त 68 शब्दांत असल्याने अभ्यासकांनी संताप व्यक्त केला आहे.
पुणे – राज्य सरकारने येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई (CBSE) पॅटर्न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन अभ्यासक्रमानुसार चौथी ते बारावीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवरील केवळ एकच धडा असून, तो फक्त 68 शब्दांचा आहे. या गोष्टीवर इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
बलकवडे म्हणाले, “महाराष्ट्राने जे सीबीएसई पॅटर्न स्वीकारले आहे, त्यामध्ये मराठा साम्राज्य व शिवाजी महाराज यांचा इतिहास केवळ दोन पानांपुरता सीमित करण्यात आला आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी असून, इतिहासावर अन्याय करणारी आहे. 2008 साली जेव्हा सीबीएसई अभ्यासक्रमाची रचना झाली, तेव्हाही सातवीच्या पुस्तकात फक्त तीन ओळींच्या माध्यमातून शिवरायांचा उल्लेख केला गेला होता. मराठ्यांच्या 2200 पानांच्या गौरवशाली इतिहासासाठी फक्त दोन पानं देणं म्हणजे अपमानच आहे.”
advertisement
“पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांना देशाचा आदर्श मानतात. जर खरोखरच महाराजांना पिढीचा आदर्श ठरवायचं असेल, तर त्यांचा इतिहास योग्य प्रमाणात व आदराने अभ्यासक्रमात असायला हवा. शिवाजी महाराजांनी केवळ परकीय सत्तांविरुद्ध संघर्ष केला नाही, तर लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली,” असंही बलकवडे म्हणाले.
advertisement
राज्य सरकार एनसीईआरटीचा अभ्यासक्रम स्वीकारत असेल, तर इंग्रजी आणि गणित यांसारख्या विषयांसाठी राष्ट्रीय समानता चालू शकते. मात्र इतिहासासारख्या संवेदनशील विषयासाठी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महत्त्वाची जाणीव ठेवून, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने तयार केलेली पुस्तकंच वापरण्यात यावीत. इतिहास हे केवळ माहितीच नव्हे तर मूल्यांचं शिक्षण देणारे माध्यम आहे. युवापिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास शिकवला गेला पाहिजे, तरच त्यांच्यात नेतृत्व, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक भान विकसित होईल, असं बलकवडे म्हणतात.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
June 01, 2025 10:15 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त 68 शब्दांत, CBSE पॅटर्नवर अभ्यासकांचा आक्षेप, Video