HSC Board Exam 2024 : मोठी बातमी! उद्यापासून बारावीची परीक्षा, शिक्षण मंडळाने आणला नवीन नियम, विद्यार्थ्यांना होणार फायदा
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्यात आली आहे.
पुणे, वैभव सोनवणे, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. ही परीक्षा बुधवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ ते मंगळवार, दिनांक १९ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी एकूण १५,१३,९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये ८,२१,४५० विद्यार्थी व ६,९२,४२४ विद्यार्थीनी आहेत. एकूण १०४९७ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ३३२० मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
दरम्यान या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. गतवर्षीप्रमाणेच फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेसाठी देखील परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे अधिकची वेळ वाढवून देण्यात आलेली आहे.
परीक्षेची प्रमुख वैशिष्ट
१) फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्यात आलेली असून सरल डेटावरुन कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती घेऊन आवेदनपत्रे ऑनलाईन भरलेली आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी दिनांक २०/०२/२०२४ पर्यंत आवेदनपत्रे स्विकारण्यात आलेली आहेत.
advertisement
2). विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून परीक्षेदरम्यान महत्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. मंडळामार्फत प्रसिध्द व छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये.
३) फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचे वेळापत्रक गुरूवार दिनांक ०२/११/२०२३ रोजी मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले आहे.
advertisement
४) परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय स्तरावर मंडळामध्ये जिल्हानिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच राज्य मंडळ व ९ विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
advertisement
५) सदर परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक (रनर) परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. तसेच त्यांनी परिरक्षण केंद्रावरून गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंत व वितरीत करेपर्यंतचे चित्रीकरण मोर्बाइलमध्ये करण्याबाबतच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत.
६) प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करण्याकरिता व उत्तरपत्रिका आणण्याकरिता नेमण्यात आलेल्या सहाय्यक परिरक्षक (रनर) यांनी जीपीएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक करण्यात आलेले आहे.
advertisement
७) सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रातही (Hall Ticket) नमूद करण्यात आलेले आहे. सकाळ सत्रात स. १०.३० वाजता व दुपार सत्रात दु. २.३० वाजता परीक्षार्थ्याने परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळ सत्रात स.११.०० वाजता तसेच दुपार सत्रात दु. ३.०० वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल.
advertisement
८) गतवर्षीप्रमाणेच फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेसाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आलेली आहे.
९) लेखी परीक्षेपूर्वी गैरमार्ग प्रकरणी विद्यार्थ्यांसमोर शिक्षा सूचीचे तसेच उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस असलेल्या सूचनांचे वाचन करणेबाबत सर्व उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळामार्फत सूचित करण्यात आलेले आहे.
१०) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना दिनांक १६/१०/२०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार गणित, पुस्तपालन व लेखाकर्म, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांच्या परीक्षांसाठी कॅलक्युलेटर वापरण्यास परवानगी देण्यात येत आहे. विद्यार्थ्याने कॅलक्युलेटर स्वतःचा आणावयाचा आहे. सदर कॅलक्युलेटर फक्त कॅलक्युलेटर स्वरूपातीलच असावा. मोबाईल मधील अथवा इतर इलेक्ट्रॉनिक्स साधनांमधील कॅलक्युलेटर वापरता येणार नाही.
advertisement
११) संपूर्ण राज्यासाठी एक नियोजनबध्द व सर्व घटक समावेशक असा 'गैरमार्गाशी लढा' या अभियानाचा कृति कार्यक्रम या वर्षी देखील मंडळाने राबविण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात एकसूत्रीपणा हे तत्व विचारात घेवून याबाबत नियोजन करण्यात आले आहे व त्यानुसार स्थानिक दक्षता समिती व केंद्रस्तर सभा, पालकसभा, विद्यार्थ्यांचे उद्बोधन, इ.द्वारे या अभियानाचा कृति कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. त्यामुळे परीक्षेशी संबंधित घटकांच्या विशिष्ट वैचारिक मनोवृत्तीमध्ये सकारात्मक बदल होण्यास व परीक्षेतील गैरप्रकार कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
१२) परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा यादृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक जिल्हयामध्ये मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत असून काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच मा. विभागीय आयुक्त, मा. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे. तसेच मंडळ सदस्य आणि शासकीय अधिकारी यांना परीक्षा केंद्राना आकस्मिक भेटी देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
१३) तसेच प्रात्यक्षिक परीक्षा सुरळीत व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक व योजना), सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विस्तार अधिकारी यांना प्रात्यक्षिक परीक्षा काळात कमीत कमी १० उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी देणेबाबत सूचित करण्यात आले आहे.
१४) सर्व मा. विभागीय आयुक्तांना तसेच मा. जिल्हाधिकारी यांना अर्धशासकीय पत्र पाठवून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व अधिक जबाबदार भावी पिढी निर्माण व्हावी याकरीता व परीक्षा पध्दतीवरील विश्वास व आदर वृध्दींगत होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांच्या मदतीने 'गैरमार्गविरूध्द लढा' हे अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन केले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
February 20, 2024 12:19 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
HSC Board Exam 2024 : मोठी बातमी! उद्यापासून बारावीची परीक्षा, शिक्षण मंडळाने आणला नवीन नियम, विद्यार्थ्यांना होणार फायदा


