नदीवरील पुलाच्या कठड्यावर उभी होती महिला; उडी मारणार इतक्यात 'देवदूत' आले धावून अन्...
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
थेऊर-कोलवडी पुलावर एक महिला आत्महत्येच्या उद्देशाने कठड्यावर उभी असल्याची माहिती एका जागरूक नागरिकाने थेऊर पोलीस चौकीत धावत जाऊन दिली.
पुणे : पुण्यातील लोणी काळभोर पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे एका २६ वर्षीय महिलेचा जीव वाचला आहे. आर्थिक विवंचनेतून मुळा-मुठा नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेसाठी पोलीस अक्षरशः 'देवदूत' ठरले. ही घटना शुक्रवारी (९ जानेवारी) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास थेऊर येथील नदीच्या पुलावर घडली.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, थेऊर-कोलवडी पुलावर एक महिला आत्महत्येच्या उद्देशाने कठड्यावर उभी असल्याची माहिती एका जागरूक नागरिकाने थेऊर पोलीस चौकीत धावत जाऊन दिली. माहिती मिळताच कोणताही विलंब न लावता महिला पोलीस हवालदार वैशाली नागवडे आणि मार्शल पोलीस शिपाई ताम्हाणे आणि घुले यांनी तातडीने पुलाच्या दिशेने धाव घेतली.
पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा वैष्णवी नावाची 26 वर्षीय महिला नदीत उडी मारण्याच्या तयारीत होती. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तिची समजूत काढली आणि तिला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करून सुरक्षितपणे ताब्यात घेतले.
advertisement
महिलेला पोलीस चौकीत आणल्यानंतर तिचे पती सुरेश पांडागळे यांना बोलावण्यात आले. चौकशीदरम्यान, घराची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने आणि सततच्या अडीअडचणींमुळे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतल्याचे त्या महिलेने सांगितले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के आणि वैशाली नागवडे यांनी पती-पत्नीचे समुपदेशन केले. गरिबी किंवा अडचणींवर मात करता येते, पण जीवन संपवणे हा पर्याय नाही, असा धीर देत त्यांना सुखरूप घरी पाठवले.
advertisement
एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने दाखवलेल्या या धाडसामुळे आणि समयसूचकतेमुळे एका कुटुंबाचा आधार वाचला असून, लोणी काळभोर पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 11:14 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
नदीवरील पुलाच्या कठड्यावर उभी होती महिला; उडी मारणार इतक्यात 'देवदूत' आले धावून अन्...










