Pune Leopard: रात्रीच्या अंधारात तरुण फोनवर बोलण्यात गुंग; अचानक बिबट्यानं घेतली अंगावर झेप अन्..., जुन्नरमधील थरार
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
तनिष फोनवर बोलत उभा असतानाच अचानक बिबट्याने त्याच्या दिशेने झेप घेतली आणि त्याच्यावर हल्ला चढवला. बिबट्याच्या नखांनी तनिषच्या पोटरीवर मोठे ओरखडे उमटले.
पुणे: जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांची वाढती संख्या कायम आहे. नुकतीच बिबट्याच्या हल्ल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. यात नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत साकार नगरी सोसायटीजवळ बुधवारी (३ डिसेंबर) रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास थरारक घटना घडली. रात्रीच्या अंधारात मोबाईलवर बोलत उभा असलेल्या तनिष नवनाथ परदेशी (वय १८) या तरुणावर बिबट्याने अचानक हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, तनिष नवनाथ परदेशी हा तरुण रात्री सव्वा आठ वाजता साकार नगरी सोसायटीजवळ अंधारात फोनवर बोलत होता. मोबाईलवर बोलण्यात तो इतका गुंग झाला होता की, त्याला आजूबाजूच्या परिस्थितीची कल्पना आली नाही. तनिष फोनवर बोलत उभा असतानाच अचानक बिबट्याने त्याच्या दिशेने झेप घेतली आणि त्याच्यावर हल्ला चढवला. बिबट्याच्या नखांनी तनिषच्या पोटरीवर मोठे ओरखडे उमटले. हल्ल्यात तो जखमी झाला. मात्र, त्याचं नशीब बलवत्तर असल्यानं तो मोठ्या हल्ल्यापासून बचावला आणि त्याला जीवदान मिळालं.
advertisement
हल्ल्यानंतर तनिषला तातडीने नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिसराची पाहणी केली.
वन विभागाने केलेल्या ड्रोन पाहणीत वारुळवाडीतील मीनाक्षी कृपा वसतीगृह परिसरात, घटनास्थळापासून केवळ २०० फूट अंतरावर तीन बिबटे आढळले आहेत. यामुळे परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
advertisement
या घटनेच्या एक दिवस आधीच, याच परिसरात बिबट्याने चार पाळीव जनावरांवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच हा मानवावरील हल्ला झाला आहे. वन विभागाने या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात आठ पिंजरे लावले आहेत.
गेल्या काही दिवसांत जुन्नर तालुक्यातील ओतूर, शेटेवाडी आणि शिवनेरी परिसराप्रमाणेच नारायणगाव भागातही बिबट्यांच्या हल्ल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. वन विभागाकडून नागरिकांना रात्रीच्या वेळी मुक्त संचार टाळण्याचे आणि बिबट्या दिसल्यास तातडीने वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 05, 2025 12:34 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Leopard: रात्रीच्या अंधारात तरुण फोनवर बोलण्यात गुंग; अचानक बिबट्यानं घेतली अंगावर झेप अन्..., जुन्नरमधील थरार


