Pune Traffic : शिवाजीनगर, कोथरुडमधील वाहतूक कोंडीची झंझट संपणार, पुणे महापालिकेचा गेम चेंजर प्रोजेक्ट!
Last Updated:
Shivajinagar Kothrud Traffic : शिवाजीनगर आणि कोथरुड परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या लवकरच संपणार आहे. पुणे महापालिकेने उड्डाण पूल आणि बोगद्याचा समावेश असलेला गेम चेंजर प्रोजेक्ट हाती घेतला असून काम लवकरच सुरू होणार आहे
पुणे : पुण्यातील शिवाजीनगर आणि कोथरुड परिसरात दररोज वाहतूककोंडीची समस्या गंभीर होत आहे. आता ही समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने मेगा प्लॅन आखला आहे. नेमका हा प्रकल्प कसा असेल या बाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
'या' मार्गावर होणार उन्नत रस्ता
पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने बालभारती ते पौड फाटा या रस्त्याचा नवा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या आराखड्यात उन्नत रस्ता (उड्डाणपूल) आणि बोगदा अशा पर्यायांचा विचार करण्यात येणार आहे. पूर्वी तयार केलेल्या आराखड्यानुसार या प्रकल्पाचा खर्च 32 कोटी रुपये होता. मात्र, आता नव्या आराखड्यानुसार तो जवळपास 300 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
advertisement
हा प्रकल्प काही वर्षांपूर्वी आखण्यात आला होता. पण पर्यावरणवाद्यांनी या रस्त्याला आक्षेप घेतल्याने त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाकडून मिळालेल्या स्थगितीमुळे हा प्रकल्प अनेक वर्षे थांबला. आता वाढत्या वाहतुकीचा विचार करून महापालिकेने पुन्हा नव्याने आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिका आयुक्त राम म्हणाले, “नव्या आराखड्यात पर्यावरणाचा विचार करून रस्ता, उड्डाणपूल आणि बोगदा या तिन्ही पर्यायांचा सखोल अभ्यास होईल. तसेच न्यायालयाच्या निर्देशानुसार पर्यावरणीय परवानगीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे.”
advertisement
या प्रकल्पासाठी महापालिकेने अद्याप निधीची तरतूद केलेली नाही. सध्या चालू आर्थिक वर्षात इतर सुरू असलेल्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे या प्रकल्पासाठी निधी पुढील अंदाजपत्रकात राखून ठेवला जाईल, अशी माहितीही आयुक्तांनी दिली. महापालिकेच्या नव्या आराखड्यामुळे बालभारती ते पौड फाटा मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 12:31 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic : शिवाजीनगर, कोथरुडमधील वाहतूक कोंडीची झंझट संपणार, पुणे महापालिकेचा गेम चेंजर प्रोजेक्ट!


