Pune Crime: पुणेकरांनो लॉक लावून घराबाहेर जाणार असाल तर 'ही' एक चूक करू नका, 2 धक्कादायक घटना समोर
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणेकरांनी घराला कुलूप लावून बाहेर जाताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कोथरूड आणि कात्रजमधील आंबेगाव परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांनी शहरात खळबळ उडवली आहे
पुणे :पुणे शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे पुणेकरांनी घराला कुलूप लावून बाहेर जाताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कोथरूड आणि कात्रजमधील आंबेगाव परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी ३ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. शहरात वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक सुरक्षिततेबाबत चिंतेत आहेत.
पहिली घटना: कात्रजमधील आंबेगाव बुद्रुक येथील जांभूळवाडी रस्त्यावर असलेल्या 'केंदूळकर निवास'मध्ये घरफोडीची पहिली घटना घडली. मंगळवारी (१३ जानेवारी) दुपारी घर बंद असताना चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून भामटे पसार झाले. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक कळमकर पुढील तपास करत आहेत.
advertisement
दुसरी घटना: कोथरूडमधील आत्रेय सोसायटीत दुसरी घरफोडी झाली. तक्रारदार महिला वारजे भागात राहतात, तर त्यांचे आई-वडील या सोसायटीत राहतात. १२ जानेवारी रोजी चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून, पोलीस हवालदार माळी या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
पुणे शहर आणि उपनगरांमध्ये अलीकडच्या काळात घरफोड्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. सोसायट्यांमध्ये सुरक्षा रक्षक असूनही भरदिवसा होणाऱ्या या चोऱ्यांमुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कुलूप लावून बाहेरगावी जाणे आता नागरिकांसाठी धोक्याचे ठरू लागले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. मात्र, यासोबतच नागरिकांनीही बाहेरगावी जाताना आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेणं आणि त्या व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवणंही गरजेचं आहे
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 9:08 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: पुणेकरांनो लॉक लावून घराबाहेर जाणार असाल तर 'ही' एक चूक करू नका, 2 धक्कादायक घटना समोर










