Cyber Crime : तुम्हालाही असा फोन आला तर सावधान! क्षणातच पुण्यातील आजोबांचे 16 लाख खात्यातून गायब
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
२ नोव्हेंबर रोजी सायबर भामट्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. आपण बँकेतून बोलत असल्याचे भासवून, ज्येष्ठ नागरिकाला 'पेन्शन सर्टिफिकेट' देण्याचे आमिष दाखवले.
पुणे : सायबर गुन्हेगार नवनवीन मार्गांनी नागरिकांना फसवण्याचे प्रकार सातत्याने करत आहेत. याचाच अनुभव मॉडेल कॉलनीतील एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला आला आहे. 'तुमचे पेन्शन सर्टिफिकेट तयार करत आहोत,' अशी बतावणी करून सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून तब्बल १६ लाख ५ हजार रुपयांची मोठी रक्कम ऑनलाईन पद्धतीने काढून घेऊन फसवणूक केली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉडेल कॉलनी परिसरात राहणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकाचे एका राष्ट्रीयीकृत बँकेत खातं आहे. २ नोव्हेंबर रोजी सायबर भामट्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. आपण बँकेतून बोलत असल्याचे भासवून, ज्येष्ठ नागरिकाला 'पेन्शन सर्टिफिकेट' देण्याचे आमिष दाखवले.
चोरट्यांनी मोठ्या कौशल्याने त्यांना बोलण्यात गुंतवून घेतले आणि त्यांच्या बँक खात्याशी संबंधित सर्व गोपनीय माहिती (ओटीपी, खाते क्रमांक) काढून घेतली. या माहितीचा गैरवापर करत चोरट्यांनी काही क्षणातच त्यांच्या बँक खात्यातून १६ लाख ५ हजार रुपये परस्पर आपल्या खात्यात वळते केले.
advertisement
आपल्या खात्यातून एवढी मोठी रक्कम गायब झाल्याचे लक्षात येताच ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे धाव घेतली. या घटनेमुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यातही सायबर चोरट्यांनी 'पेन्शन सर्टिफिकेट'च्या बहाण्याने कोंढव्यातील एका महिलेला फसविले होते. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अश्विनी ननावरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 03, 2025 2:00 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Cyber Crime : तुम्हालाही असा फोन आला तर सावधान! क्षणातच पुण्यातील आजोबांचे 16 लाख खात्यातून गायब


