Koyta Gang : शिक्षणाचं माहेरघर बनतय 'कोयता गँग'चा अड्डा; 10 महिन्यांत दाखल गुन्ह्यांचा आकडा वाचून बसेल धक्का
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान पुणे शहर पोलिसांनी कोयत्याशी संबंधित २०० गुन्हे नोंदवले आहेत. या गुन्ह्यांमध्ये एकूण ४०३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पुणे : पुणे शहर अजूनही 'कोयता गँग'च्या दहशतीखाली आहे. या वर्षात जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत कोयता वापरून हिंसाचार आणि गुन्हेगारीचे तब्बल 200 गुन्हे दाखल झाल्याची धक्कादायक माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार विजयबापू शिवतारे, रोहित पवार आणि महेश सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही आकडेवारी सादर केली.
जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान पुणे शहर पोलिसांनी कोयत्याशी संबंधित २०० गुन्हे नोंदवले आहेत. या गुन्ह्यांमध्ये एकूण ४०३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ज्यात १०३ अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. फडणवीस यांनी सभागृहाला सांगितलं की, जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पुणे शहरात संघटित गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत १७३ गुन्हे, तर मोक्का (MCOCA) कायदा, १९९९ अंतर्गत ३८० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तसंच गुंड, दारूविक्रेते, अमली पदार्थ तस्कर आणि इतर गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी एमपीडीए (MPDA) कायदा, १९८१ अंतर्गत १०४ प्रस्ताव सादर करण्यात आले.
advertisement
ऑक्टोबर २०२५ मध्ये गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अमोल काटकर यांच्यावर झालेल्या कथित कोयता हल्ल्याबाबत विचारले असता, फडणवीस म्हणाले की, काटकर यांच्या दुचाकीची दुसऱ्या दुचाकीला धडक झाल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर काठीने हल्ला केला. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात काटकर यांच्या पाठीला, कपाळाला आणि कानाला दुखापत झाली. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात बीएनएस (BNS) कायद्याच्या कलम ११, ११८(२), ११५(२), ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि तपास सुरू आहे.
advertisement
गँगस्टर निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ यांच्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती देताना, फडणवीस यांनी सांगितलं की, कोथरूड पोलीस ठाण्यात नऊ, तर वारजे-मालवाडी पोलीस ठाण्यात एक असे एकूण १० गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे बीएनएस (२०२३), माहिती तंत्रज्ञान अधिनियम (२०००), दूरसंचार अधिनियम (२०२३), पासपोर्ट अधिनियम (१९६७), आर्म्स ॲक्ट (१९५९), महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१), मोक्का (MCOCA), आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट या विविध कलमांखाली नोंदवले आहेत. मात्र, बनावट कागदपत्रे वापरून शस्त्र परवाना मिळवल्याच्या आरोपावरून घायवळ बंधूंवर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 11, 2025 10:06 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Koyta Gang : शिक्षणाचं माहेरघर बनतय 'कोयता गँग'चा अड्डा; 10 महिन्यांत दाखल गुन्ह्यांचा आकडा वाचून बसेल धक्का










