Pune Accident: बसमध्ये 30 ते 40 लहान मुलं; मद्यधुंद चालक नशेत बस चालवू लागला अन्... पुण्यातील घटनेनं खळबळ
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
Pune School Bus Accident : अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, अपघाताच्या वेळी बसमध्ये ३० ते ४० शालेय मुले होती.
पुणे : वाघोलीतील बायफ रस्त्यावर बुधवारी दुपारी एका मद्यधुंद स्कूल बसचालकाने मोठा धुमाकूळ घातला. नशेत असलेल्या या चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन दुचाकी आणि एका कारला जोरात धडक दिली. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, अपघाताच्या वेळी बसमध्ये ३० ते ४० शालेय मुले होती. सुदैवाने, या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमकं काय घडलं?
दुपारी पावणेतीनच्या सुमारास बायफ रस्त्यावरील एका नामांकित शाळेची बस मुलांना घरी सोडण्यासाठी निघाली होती. बसचालक बत्ता वसंत रसाळ (वय ५०) हा पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहनांना एकापाठोपाठ एक धडक दिली. अपघातानंतर नागरिकांनी आरडाओरडा करत बसचा पाठलाग केला आणि काही अंतरावर बस अडवली.
advertisement
संतप्त नागरिकांचा बसचालकाला चोप
चालक नशेत असल्याचे लक्षात येताच उपस्थित नागरिकांचा संयम सुटला आणि त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. या प्रकारामुळे परिसरात मोठा गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच लोणी कंद पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि चालकाला ताब्यात घेतले.
वैद्यकीय तपासणीत मद्यप्राशन स्पष्ट
पोलिसांनी बसचालक बत्ता रसाळ याची वैद्यकीय तपासणी केली असता, त्याने मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. पोलीस अंमलदार प्रशांत धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, निष्काळजीपणाने बस चालवून मुलांच्या आणि नागरिकांच्या जिवाशी खेळल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 9:40 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Accident: बसमध्ये 30 ते 40 लहान मुलं; मद्यधुंद चालक नशेत बस चालवू लागला अन्... पुण्यातील घटनेनं खळबळ








