Pune News: अपघातग्रस्तांसाठी ठरला जीवनदान! हेल्प रायडर्स अनेकांचे वाचले प्राण
- Reported by:Prachi Balu Kedari
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
समाजासाठी काहीतरी देणं लागतं आणि आपल्या हातूनही कुणाचा तरी जीव वाचावा, या उद्देशाने सुरू झालेल्या ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्स या चळवळीमुळे आज महाराष्ट्रभरात अनेकांना जीवनदान मिळत आहे.
पुणे: समाजासाठी काहीतरी देणं लागतं आणि आपल्या हातूनही कुणाचा तरी जीव वाचावा, या उद्देशाने सुरू झालेल्या ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्स या चळवळीमुळे आज महाराष्ट्रभरात अनेकांना जीवनदान मिळत आहे. रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या ॲम्ब्युलन्ससाठी तातडीने वाट करून देणे, अपघातग्रस्तांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे आणि आपत्कालीन प्रसंगी मदतीसाठी धावून जाणे, हे या संस्थेचे मुख्य काम आहे.
पुण्यात 2018 पासून सुरू झालेली ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्स ही चळवळ आज सातव्या वर्षात पदार्पण करत असून आतापर्यंत 1200 हून अधिक जणांचे प्राण वाचवण्यात या संस्थेचा मोठा वाटा आहे. सध्या महाराष्ट्रभरातून 3 हजारांहून अधिक स्वयंसेवक हेल्प रायडर्स म्हणून सक्रियपणे कार्यरत आहेत. पुणे, छत्रपती संभाजीनगर, कराड, सांगली, सातारा या भागांसह आता मुंबईतही ही चळवळ वेगाने विस्तारत आहे. चळवळीच्या स्थापनेमागे महाराष्ट्रातील दोन हृदयद्रावक घटनांनी प्रेरणा दिली.
advertisement
कोल्हापूर येथे ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या ॲम्ब्युलन्समुळे 10 वर्षांच्या मुलाला वेळेत रुग्णालयात पोहोचवता आले नाही आणि वडिलांच्या मांडीवरच त्याचा मृत्यू झाला. यानंतर पुण्यातील एक घटना घडली, ज्यात तत्कालीन आयुक्त सौरभ राव यांचा मुलगा पाषाण परिसरात सायकलिंग करत असताना त्याचा अपघातग्रस्त झाला. त्याला जवळपास अर्धा तास कोणतीही मदत मिळाली नाही. अखेर एका ओला चालकाने त्यांना रुग्णालयात पोहोचवले. ती मदत वेळेत मिळाली नसती तर परिस्थिती गंभीर झाली असती.
advertisement
या दोन्ही घटनांनी समाजात तातडीच्या मदतीची गरज अधोरेखित केली आणि त्यातूनच ‘हेल्प रायडर्स’ चळवळीचा जन्म झाला. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत कनोजिया सांगतात की, रस्त्यावर कुठेही अपघात झाला किंवा ॲम्ब्युलन्स अडकली, तर मदतीसाठी कुणीतरी पुढे यायलाच हवं. एक जीव वाचावा, याच उद्देशाने 2018 मध्ये ही चळवळ सुरू केली. आजपर्यंत 1000 ते 1200 रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यात आम्हाला यश आलं आहे.
advertisement
हेल्प रायडर्स कसे काम करतात, याबाबत माहिती देताना बाळासाहेब ढमाले म्हणाले, आपण कुठेही प्रवास करत असताना ॲम्ब्युलन्स दिसली, तर आपली गाडी डाव्या बाजूला घेऊन इतर वाहन चालकांनाही वाट मोकळी करण्याचं आवाहन करतो. गोंधळ असलेल्या ठिकाणी समन्वय साधून ॲम्ब्युलन्सला पुढे नेण्यासाठी मदत केली जाते. माणूस, प्राणी किंवा पक्षी असा प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे.
advertisement
आज ही चळवळ केवळ स्वयंसेवकांच्या उत्साहावर उभी असून, नागरिकांच्या सहकार्यामुळेच ती यशस्वी होत आहे. रस्त्यावरची काही मिनिटांची मदत एखाद्याचं संपूर्ण आयुष्य वाचवू शकते, याच जाणीवेतून ‘ऍम्ब्युलन्स हेल्प रायडर्स’ समाजासाठी अखंडपणे कार्यरत आहेत.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 8:20 PM IST









