Pooja Khedkar Case : पूजा खेडकरला दिलासा; न्यायालयातून मोठी बातमी समोर
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Pooja Khedkar : पूजा खेडकर हिला तात्काळ अटक करण्याची गरज नसल्याचं म्हणत न्यायालयाने तपास यंत्रणेला अटक न करण्याचे आदेश दिलेत.
वैभव सोनवणे, पुणे : वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर हिला दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. तिने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होती. युपीएससीने तिच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर तिने जामीनासाठी अर्ज केला होता. आता पूजा खेडकरच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी २१ ऑगस्टला होणार आहे. तोपर्यंत तिच्या अटकेला स्थगिती दिली आहे.
अटकपूर्व जामीन अर्जाच्या याचिकेवर न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सुनावणी केली. खेडकर यांच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता सिद्धार्थ लुथरा यांनी तर युपीएससीच्या वतीने नरेश कौशिक यांनी न्यायालयात बाजू मांडली. तात्काळ अटकेची गरज नसल्याचं म्हणत न्यायालयाने तपास यंत्रणेला अटक न करण्याचे आदेश दिलेत. प्रकरण न्यायालयात असून तिला अटक करू नये असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले.
advertisement
पूजा खेडकरने बनावट कागदपत्रे, दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचे आरोप करण्यात आले आहेत. युपीएससीकडूनही याबाबत स्पष्ट सांगण्यात आलंय की तिने वेगवेगळ्या नावांचा वापर केला. युपीएससीने यासंदर्भात डेटाही तपासला आणि यात केवळ पूजा खेडकर हीच दोषी आढळलीय. तिची नियुक्ती रद्द करण्यात आली असून तिला पुढील परीक्षेसाठीही अपात्र ठरवलं आहे. यापुढे युपीएससीच्या परीक्षेसाठी बसता येणार नाही असंही युपीएससीने स्पष्ट केलं होतं.
advertisement
युपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर पूजा खेडकरची पुण्यात प्रशिक्षणार्थी आयएएस म्हणून नियुक्ती झाली होती. पुण्यात तिने खासगी गाडीवर अंबर दिवा लावल्याने आणि वरिष्ठांची केबिन बळकावल्याचे आरोप झाले. त्यानंतर तिच्याविरोधात अनेकांनी आरोप करत खळबळजनक दावे केले होते. तिच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरही शंका उपस्थित केली गेली होती. शेवटी तिची बदली वाशिमला करण्यात आली. मात्र आरोप जास्तच गंभीर असल्याने तिचे प्रशिक्षण थांबवून तिला तात्काळ मसुरीतील अकादमीत हजर राहण्याचे आदेश दिले. त्यानंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून ती अद्याप मसुरीत दाखल झालेली नाही.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Aug 12, 2024 12:31 PM IST










