Pune Road Accident: पुण्यातील वारजे पुलावर भीषण अपघात, एकामागे एक अनेक गाड्या धडकल्या
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पुण्यात वारजे पुलाजवळ रविवारी रात्री दोन अपघात झाले. ट्रक ब्रेक फेल होऊन सहा वाहनांना धडक दिली. काही जण किरकोळ जखमी झाले. वाहतूक कोंडी निर्माण झाली.
अभिजित पोते, प्रतिनिधी पुणे: पुण्यात अपघातांच्या मालिका काही संपण्याचे नाव घेत नाहीत. नवले पूल असो किंवा वारजे पूल असो अपघातांची मालिका काही संपत नाही. पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. पुण्यातील वारजे परिसरात रविवारी रात्री एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटना घडल्याने काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. चांदणी चौकाहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हे दोन्ही अपघात घडले.
पहिला अपघात वारजे पुलावर झाला. एका पिकअप वाहनाने पुढे जाणाऱ्या ट्रकला धडक दिली. या धडकेत काही जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याची माहिती आहे. दरम्यान, याच मार्गावर काही अंतरावर दुसरा आणि अधिक गंभीर स्वरूपाचा अपघात घडला. वारजे पुलाजवळ साताऱ्याकडे जाणाऱ्या लेनवर एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रकने थेट एका ट्रॅव्हलर बससह इतर सहा वाहनांना जोरदार धडक दिली. या साखळी अपघातामुळे रस्त्यावर एकामागोमाग अनेक वाहने एकमेकांवर आदळली.
advertisement
या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसली, तरी काही जण किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालकाचे वैद्यकीय परीक्षण करण्यात आले असून त्याच्याविरोधात संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही अपघातांमुळे चांदणी चौक ते वारजे आणि साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर काही काळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. सुमारे काही वेळानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 17, 2025 2:28 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Road Accident: पुण्यातील वारजे पुलावर भीषण अपघात, एकामागे एक अनेक गाड्या धडकल्या










