Beed Lok Sabha Constituency : पवारांच्या भेटीनंतर ज्योती मेटे यांनी घेतला मोठा निर्णय! पंकजा मुंडेंना निवडणूक जड जाणार?
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Beed Lok Sabha Constituency : शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
पुणे, (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी) : बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने यावेळी पंकजा मुंडे यांना तिकीट दिले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील शरद पवार गटाकडून शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख ज्योती मेटे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीड लोकसभेत चुरस निर्माण झाली आहे. माजी आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी काल (19 मार्च) दुसऱ्यांदा पवार गटाची भेट घेतली. यावेळी शिवसंग्रामच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच बीडच्या उमेदवारीचा ज्योती मेटे निर्णय घेतील, अशी माहिती शिवसंग्रामचे प्रदेश प्रवक्ता तुषार काकडे यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर ज्योती मेटे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
ज्योती मेटे यांनी घेतला मोठा निर्णय
शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांचं अपघाती निधन झाल्यानंतर संघटनेची जबाबदारी ज्योती मेटे यांच्यावर आली होती. आता लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मेटे यांनी बीडमधून लोकसभा लढवण्याची विनंती केली होती. त्यानुसार शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. अशात आता ज्योती मेटे यांनी शासकीय सेवेतून कार्यमुक्त होणार असल्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर ज्योती मेटे बीडमधून पवार गटाच्या तिकिटावर लोकसभा लढण्याची शक्यता बळावली आहे.
advertisement
ज्योती मेटे यांची पवारांसोबत बैठक
ज्योती मेटे दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन बीड लोकसभा लढण्यासंबंधीचा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे प्रदेश प्रवक्ते तुषार काकडे यांनी दिली. मेटे या गेल्या रविवारी देखील शरद पवार यांना भेटल्या आहेत. पवार गटाकडून त्या मैदानात उतरल्यास बीडमध्ये पंकजा मुंडे विरूद्ध ज्योती मेटे अशी रंगतदार लढत होऊ शकते. मराठा नेते विनायक मेटे यांचं गेल्यावर्षी अपघाती निधन झाल्याने शिवसंग्रामची जबाबदारी सध्या ज्योती मेटेच सांभाळत आहेत.
advertisement
वाचा - Lok Sabha Election 2024: अजित पवारांचा अमोल कोल्हेंविरोधात डाव; शिरूरमधील महायुतीचा उमेदवार ठरला
ज्योती मेटे लोकसभा लढणार?
ज्योती मेटे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे ज्योती मेटे यांनी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवावी यासाठी बीडमधील शिवसंग्राम भवन येथे एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ज्योती मेटे यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली पाहिजे असं एकमताने ठरविण्यात आले. त्यामुळे आता ज्योती मेटे नेमका काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
शरद पवार उमेदवारी देणार?
महाविकास आघाडीत बीडची जागा शरद पवारांना सुटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीवेळी धनंजय मुंडे अजित पवारांच्या गटात सहभागी झाले. अशात पंकजा मुंडे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचे आव्हान पवारांसमोर आहे. दरम्यान, विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे ह्या तुल्यबल उमेदवार ठरू शकतात. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. विनायक मेटे यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठं योगदान आहे. मराठा आरक्षणाच्या बैठकीला जातानाच त्यांचा अपघात झाला होता. त्यामुळे ज्योती मेटेंना सहानुभूती मिळू शकते. त्यामुळे पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 20, 2024 3:29 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Beed Lok Sabha Constituency : पवारांच्या भेटीनंतर ज्योती मेटे यांनी घेतला मोठा निर्णय! पंकजा मुंडेंना निवडणूक जड जाणार?









