Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा, कोल्हापूरचा सूरज करतोय पुण्याचं काम!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Ashadhi Wari 2025: पंढरीच्या वाटेने वारकरी निघाले की वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा मानून काहीजण जमेल ती सेवा करत असतात. कोल्हापूरचा तरुण आपल्या सहकाऱ्यांसह मोफत दाढी-कटिंग करतोय.
पुणे : आषाढी वारी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि सेवेचा संगम. लाखो वारकरी विठ्ठल भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करत असतात. या वारीमध्ये प्रत्येकजण आपल्या परीने सेवा देत असतो. अगदी कोणीतरी पाणी पाजतो, अन्नदान करतो, तर कोणी वैद्यकीय मदत देतो. अशीच एक आगळीवेगळी सेवा देत कोल्हापूरचा सूरज बनकर आहे. तो वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे केस कटिंग आणि दाढी करण्याचे काम विनामूल्य करत आहे.
सूरज सांगतो, वारी ही एक पवित्र यात्रा आहे. संत सेना महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी देखील माझ्या कलेद्वारे सेवा देत आहे. इतर जण जसे आपापल्या परीने योगदान देतात, तसेच मी हेअर कटिंगच्या माध्यमातून सेवा देतो. यामागे कोणताही आर्थिक हेतू नाही. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहून आणि 'राम कृष्ण हरी' असं त्यांच्या तोंडून ऐकून खूप आनंद मिळतो.
advertisement
सूरज मूळचा कोल्हापूरचा असून गेली आठ वर्षे तो पुण्यात वास्तव्यास आहे. तो जेण्ट्स आणि लेडीज दोघांसाठीही वेगवेगळ्या प्रकारचे हेअर कट आणि ट्रीटमेंट सेवा देतो. पण वारीच्या काळात, तो आपले दैनंदिन काम थांबवून फक्त वारकऱ्यांची सेवा करतो. गेल्या दोन वर्षांपासून तो ही सेवा सुरू ठेवतोय.
advertisement
वारकरी महिनाभर चालत असतात, अनेक वेळा त्यांना केस किंवा दाढी करणं शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा कमी करण्यासाठी ही सेवा मदतीची ठरते. पुण्य मिळवण्याचा हा एक मार्ग आहे, असं मला वाटतं, असं सूरजने सांगितलं. वारकऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे, असं मानणाऱ्या सूरज बनकर याच्या या सेवेला अनेकांकडून प्रशंसा मिळत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
June 21, 2025 12:04 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा, कोल्हापूरचा सूरज करतोय पुण्याचं काम!