Jiroti Festival : आदिवासी बांधवाकडून शिका, महिलांच्या सन्मानासाठी खास उत्सव VIDEO
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
आदिवासी संस्कृतीमधील अनेक उत्सवापैकी एक असलेला हा उत्सव श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतो. त्यानंतर संपूर्ण श्रावण महिनाभर हा उत्सव चालतो.
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये अनेक पारंपरिक उत्सव साजरे केले जातात. त्यातील एक म्हणजे श्रावण महिन्यातील जिरोती उत्सव. आदिवासी संस्कृतीमधील अनेक उत्सवांपैकी एक असलेला हा उत्सव श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतो. त्यानंतर संपूर्ण श्रावण महिनाभर हा उत्सव चालतो. हा उत्सव नेमका कसा साजरा केला जातो? याबाबत माहिती मेळघाट येथील रहिवासी उमेश आलोकर यांनी दिली आहे.
महिलांच्या सन्मानासाठी जिरोती उत्सव
मेळघाटमधील आदिवासी बांधव हा जिरोती उत्सव साजरा करतात. मेळघाट येथील रहिवासी असलेले उमेश आलोकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांच्या सन्मानासाठी श्रावण महिनाभर हा उत्सव साजरा केला जातो. घरात गेरू आणि मातीचे रंग वापरून जिरोती मातेचे चित्र काढले जाते. यामध्ये महिलांचा जीवनप्रवास कसा असतो? महिलांना कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात? असा संपूर्ण देखावा त्या रंगवलेल्या चित्रांमध्ये दाखवला जातो. त्यानंतर या सर्व रंगकामाची पूजा केली जाते. त्याचबरोबर गेरू आणि मातीचा वापर करून अनेक देवी-देवतांची चित्रे काढली जातात.
advertisement
नैसर्गिक साहित्य वापरून झोका तयार करतात
श्रावण महिन्यात अनेक गावात वडाच्या झाडाला दोरी बांधून पाळणा तयार करतात आणि त्यावर झोके घेतात. तशीच परंपरा मेळघाटमधील कोरकु समुदायात देखील बघायला मिळते. श्रावण महिन्यातील जिरोती उत्सवात देखील महिला झोके घेतात. झोके घेण्यासाठी सागवानाचे लाकूड वापरून ते पाळणा तयार करतात. त्यात कुठलीही दोरी किंवा साखळी ते वापरत नाहीत. दोन खांबांना एकत्र बांधण्यासाठी झाडाच्या सालीचा वापर करतात. इतर कुठलेही साहित्य ते वापरत नाहीत.
advertisement
नैसर्गिक साहित्य वापरून अतिशय सुंदर आणि मजबूत असा झोका ते तयार करतात. त्याचबरोबर पुरुष मंडळी आदिवासी लोकपरंपरेतील नृत्य सादर करतात. सायंकाळच्या वेळी विविध पाना-फुलांनी गावात डोलार सजविला जातो. त्याची पूजा केली जाते. त्यानंतर लाकडाच्या या मोठ्या डोलाऱ्यावर एकाच वेळी आठ ते दहा महिला बसतात. त्यानंतर झोका घेत पारंपरिक गाणी गातात. जिरोती उत्सव म्हणून महिनाभर सायंकाळच्या वेळी महिला झोका घेतात. त्याचबरोबर गीत गाऊन आपला आनंद साजरा करतात.
advertisement
पोळ्याच्या दिवशी डोलार विसर्जन
view commentsसंपूर्ण श्रावण महिनाभर मेळघाटामधील चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या अनेक गावात हा उत्सव साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी या डोलारचे विसर्जन होते. या डोलारसोबत बांबूच्या पावड्यांची देखील गावात वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. त्यानंतर गावालगत नदीकाठी त्यांची पूजा केली जाते. त्यानंतर डोलार आणि पावडे नदीत विसर्जित करतात, असा हा जिरोती उत्सव संपन्न होतो.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
July 31, 2025 6:38 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Jiroti Festival : आदिवासी बांधवाकडून शिका, महिलांच्या सन्मानासाठी खास उत्सव VIDEO

