नवसाचा गणपती! आई झालेल्या 700 स्त्रियांनी सातारच्या बाप्पाचरणी फेडला नवस
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
राज्यभरात गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. परंतु आत्मगजानन मंदिरात मात्र नागपंचमीलाच हा उत्सव सुरू होतो, जो महिनाभर साजरा होऊन भाद्रपद पंचमीला संपतो.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : सध्या सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतोय. या काळात भाविक बाप्पाच्या विविध मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतात. आपल्या महाराष्ट्रात अनेक प्राचीन मंदिरं आहेत. सातारच्या धार्मिक स्थळांची तर देशभरात ख्याती आहे.
असं म्हणतात की, साताऱ्यातील अंगापूरच्या गणेशोत्सवाला तब्बल अडीचशे वर्षांची परंपरा आहे. इथल्या स्वयंभू श्री आत्मगजानन मंदिरात भाविक आपली इच्छा देवाला सांगतात. विशेषतः बाळ होण्यासाठी इथं नवस केला जातो. हा नवसाला पावणारा गणपती आहे, असं मानलं जातं. 'दौऱ्या म्हणा मोरया'च्या जयघोषात यंदा श्री आत्मगजाननाचा भद्रा उत्सव मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाला. ही परंपरा नेमकी काय आहे, याबाबत माहिती दिली राजेंद्र कणसे यांनी.
advertisement
राज्यभरात गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. परंतु आत्मगजानन मंदिरात मात्र नागपंचमीलाच हा उत्सव सुरू होतो, जो महिनाभर साजरा होऊन भाद्रपद पंचमीला संपतो. भाद्रपद शुध्द प्रतिप्रदा ते भाद्रपद शुध्द पंचमी या 5 दिवसांत इथं मोठा उत्सव असतो.
'मोरया...दोरया' या मंत्राचा जप करत गावातील लहान मुलांपासून वृद्ध व्यक्ती सलग 2 दिवस अनवाणी पायांनी दौरा करतात. त्यांना दोरेकरी म्हणतात. यंदा त्यांनी 1 रात्र आणि एका दिवसात तब्बल 60 ते 65 किलोमीटरचा प्रवास करून प्रदक्षिणा पूर्ण केली. या उत्सवात महाराष्ट्रभरातून 700 ते 800 आई झालेल्या स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. बाळ होण्याची इच्छा पूर्ण झाल्यानं त्यांनी आपल्या कुटुंबियांच्या साथीनं नवस फेडला. त्यांच्या ओटी कार्यक्रमानंतर दोरेकरी मुलांना ओलांडतात. त्यानंतर गणेश जन्म काळाचा उत्सव असतो. याची पूजा वर्षभर मंदिरात सुरू असते.
advertisement
यंदा गणेश चतुर्थीच्या संध्याकाळी परिसरातील देवतांना दोरेकऱ्यांनी कृष्णा नदीतून आणलेल्या पाण्याचा जलाभिषेक केला. मग मंदिरात प्रवेश घेतला. त्यानंतर भाद्रपद शुद्ध पंचमीला ग्रामदैवत एवर्जीनाथांच्या मंदिरात महिनाभर अनुष्ठान केलेले मानकरी दीक्षित यांनी भद्रपात्र डोक्यावर घेऊन गावातून, तसंच मंदिरात 5 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. या उत्सवात दोन्ही गावच्या श्रींच्या पालख्या घेऊन मानकरी, सेवेकरी सहभागी झाले होते.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
September 13, 2024 4:38 PM IST