Vitthal Rukmini Puja: विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदनउटी असो की नित्यपूजा, 25 मार्चपासून करा ऑनलाईन नोंदणी
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Vitthal Rukmini Puja: पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करावी अशी अनेक विठ्ठलभक्तांची इच्छा असते. आता नित्यपूजेचं ऑनलाईन बुकिंग 25 मार्चपासून सुरू होत आहे.
पंढरपूर – श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची पूजा करण्यासाठी अनेक भाविकांची इच्छा असते. अशा विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. आता सावळ्या विठुरायाच्या पूजेसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार आहे. 1 एप्रिल ते 31 जुलै या काळातील देवाच्या पूजेसाठी संकेतस्थळावरून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. येत्या 25 मार्च रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सदरची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.
श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चना पूजा, चंदनउटी पूजा आदी प्रकारच्या पूजा रोज होत असतात. या पूजा मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. तसेच मोठ्या संख्येने भाविक या पूजांसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करत आहेत.
advertisement
ऑनलाईन नोंदणी
विठ्ठल आणि रखुमाईची विविध पूजा करण्यात येतात. पूर्वी समक्ष मंदिरात येऊन पूजेची नोंदणी करावी लागत होती. मात्र राज्यासह इतर राज्यांतील भाविकांच्या अडचणी लक्षात घेता. मंदिर समितीने संगणक प्रणाली विकसित केली आहे. भाविकांना पूजेची नोंदणी https://www. vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे.
तिसऱ्या टप्प्यातील पूजा नोंदणी
यापूर्वी दोन टप्प्यांत अशा प्रकारची नोंदणी केली होती. त्याला भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता तिसऱ्या टप्प्यात 1 एप्रिल ते 31 जुलै कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, पाद्यपूजा व चंदनउटी पूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. येत्या 25 मार्च रोजी सकाळी 11 वाजलेपासून ऑनलाईन नोंदणी सुरू होतेय.
advertisement
पूजेसाठी देणगी मूल्य
श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी देणगी मूल्य घेण्यात येते. पूजेनुसार ते वेगवेगळे आहे. श्री विठ्ठलाच्या नित्यपूजेसाठी 25 हजार, रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी 11 हजार रुपये तर पाद्यपूजेसाठी 5 हजार रुपये देणगी मूल्य आहे. तुळशी अर्चन पूजेसाठी 2100 रुपये तर श्री विठ्ठल व रखुमाईच्या चंदनउटी पूजेसाठी अनुक्रमे 21 हजार व 9 हजार रुपये एवढे देणगी मूल्य आहे.
advertisement
वाढत्या उन्हामुळे चंदनउटी पूजा
ग्रीष्म ऋतूत उन्हाचा चटका वाढतो. या वाढत्या उन्हापासून श्री विठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्रात पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार यंदाच्या या पूजेला गुढीपाडव्यापासून सुरुवात होत आहे. या चंदनउटी पूजेची नोंदणी देखील ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिलीये.
advertisement
इथं साधा संपर्क
ऑनलाइन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या 02186 299299 या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा. असे आवाहन राजेंद्र शेळके यांनी केले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
March 21, 2025 12:26 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vitthal Rukmini Puja: विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदनउटी असो की नित्यपूजा, 25 मार्चपासून करा ऑनलाईन नोंदणी