advertisement

Mahashivratri 2026: 'स्वतःमध्येच परिपूर्ण' महादेवाला का करावं लागलं लग्न? वैरागी शिव कसे अडकले विवाहबंधनात

Last Updated:

Mahashivratri Shiv Marriage 2026: महादेवांनी लग्नाचा निर्णय घेणं हा केवळ वैयक्तिक सुखाचा भाग नव्हता, तर या जगाचा समतोल राखण्यासाठी घेतलेला तो एक मोठा निर्णय होता. शिव-पार्वतीच्या लग्नाआधी सर्व देव खूप काळजीत होते. तारकासुर नावाच्या राक्षसाने तिन्ही लोकांत...

News18
News18
मुंबई : हिमालयाचा शुभ्र बर्फ आणि त्या शिखरावर समाधीमध्ये लीन असलेले योगी म्हणजे देवांचे देव महादेव. त्यांना ना कशाची ओढ होती, ना कोणत्या सुखाची हाव. ते स्वतःमध्येच परिपूर्ण होते. पण मग अशा या वैराग्य धारण केलेल्या महादेवाने गृहस्थाश्रमात प्रवेश का केला? त्यांनी लग्न का केलं? ते कैलास सोडून खाली का आले? या सगळ्या प्रश्नांमागे काही खोल आध्यात्मिक आणि पौराणिक कारणं सांगितली जातात.
महादेवांनी लग्नाचा निर्णय घेणं हा केवळ वैयक्तिक सुखाचा भाग नव्हता, तर या जगाचा समतोल राखण्यासाठी घेतलेला तो एक मोठा निर्णय होता. शिव-पार्वतीच्या लग्नाआधी सर्व देव खूप काळजीत होते. तारकासुर नावाच्या राक्षसाने तिन्ही लोकांत हाहाकार माजवला होता. त्याला असं वरदान होतं की त्याचा वध फक्त शिवाचा पुत्रच करू शकेल. पण शिव तर वैरागी होते. सती गेल्यानंतर ते जगापासून पूर्णपणे अलिप्त झाले होते. दुसरीकडे, पर्वतराज हिमालयांच्या घरी पार्वतीचा जन्म झाला, जी सतीचाच पुनर्जन्म होती. तिने लहानपणापासूनच एकच ध्यास घेतला होता - शिवरायांना पुन्हा प्राप्त करण्याचा.
advertisement
पार्वतीने अन्न-पाणी सोडून कडक तपश्चर्या केली. शिवाने तिची परीक्षा घेण्यासाठी ब्राह्मणाचे रूप घेऊन स्वतःचीच निंदा केली, पण पार्वती आपल्या निश्चयावर ठाम राहिली. शेवटी तिचं निस्वार्थ प्रेम पाहून कैलासच्या योग्याने गृहस्थ होण्याचा निर्णय घेतला.
शिवाच्या विवाहाची प्रमुख कारणे -
तारकासुराचा अंत - तारकासुराचा वध केवळ शिवाचा मुलगाच करू शकत होता. त्यामुळे देवांचे कष्ट दूर करण्यासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी महादेवांचं लग्न होणं आणि कार्तिकेयाचा जन्म होणं गरजेचं होतं.
advertisement
शिव आणि शक्तीचं मिलन - आध्यात्मिक भाषेत सांगायचं तर शिव म्हणजे चेतना आणि पार्वती म्हणजे शक्ती. शक्तीशिवाय शिव निश्चल आहेत आणि शिवाशिवाय शक्तीला आधार नाही. या विश्वाच्या निर्मितीसाठी आणि संचालनासाठी या दोघांचं एकत्र येणं आवश्यक होतं.
वैराग्य आणि संसाराचा समतोल - महादेवाच्या विवाहाने जगाला हा संदेश दिला की, वैराग्य आणि गृहस्थ जीवन यात समतोल असला पाहिजे. त्यांनी पार्वतीचं समर्पण पाहून तिला आपली अर्धांगिनी म्हणून स्वीकारलं.
advertisement
शंकराची विचित्र वरात - महादेव लग्नाची वरात घेऊन निघाले तेव्हा त्यांच्यासोबत भूत-प्रेत, डाकिणी आणि अघोरी होते. हे पाहून पार्वतीची आई मैना देवी सुरुवातीला खूप घाबरल्या, पण नंतर शिवाचं दिव्य रूप पाहून त्यांनी आनंदाने लग्नाला संमती दिली.
महाशिवरात्रीचं महत्त्व - माघ कृष्ण चतुर्दशीला महादेव आणि माता पार्वतीचं लग्न झालं. शिवपुराणानुसार याच रात्री भगवान शिव अनादी-अनंत ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले होते. हा सण अज्ञानाच्या अंधारावर ज्ञानाचा विजय आणि वैराग्यातही प्रेमाचा समतोल राखण्याचं प्रतीक आहे. शिवाचं लग्न हे डोंगर सोडून खाली उतरण्यासारखं होतं. समाधीतून समाजात येणं आणि नात्यांमध्ये प्रवेश करणं, हा त्यांचा करुणेचा निर्णय होता. जरी त्यांना स्वतःला काही नको होतं, तरी जगाला सुरक्षा आणि विश्वासाची गरज होती, म्हणून त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला.
advertisement
दोन मुले आणि मानवी गरजा - शिव-पार्वतीला गणेश आणि कार्तिकेय हे दोन पुत्र झाले. हे दोघेही मानवाच्या दोन मुख्य गरजांचे प्रतीक आहेत. गणेश हे समृद्धी आणि अन्नाचे प्रतीक आहेत, तर कार्तिकेय हे संरक्षणाचे प्रतीक आहेत. भूक आणि भीती या दोन गोष्टींवर विजय मिळवणं हेच मानवी जीवनाचं ध्येय आहे. शिव-शक्तीचं नातं हे हिंदू विचारांनुसार एकांताकडून नात्यांकडे जाण्याचा एक मोठा प्रवास आहे. लग्न हे बंधन नसून एक पूल आहे आणि गृहस्थ जीवन ही बाधा नसून एक साधना आहे, हेच शिवाने आपल्याला शिकवलं. त्याग करणं महान आहेच, पण इतरांच्या सुखासाठी सहभाग घेणं त्याहूनही महान आहे.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahashivratri 2026: 'स्वतःमध्येच परिपूर्ण' महादेवाला का करावं लागलं लग्न? वैरागी शिव कसे अडकले विवाहबंधनात
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement