IND vs UAE : थर्ड अंपायरने आऊट दिलं, तरी पुढचा बॉल खेळला... भारत-युएई सामन्यात मोठा ड्रामा, Live Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कप 2025 च्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने धमाकेदार विजय मिळवला आहे. या सामन्यात टीम इंडियाने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचं कौतुक होत आहे.
दुबई : आशिया कप 2025 च्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने धमाकेदार विजय मिळवला आहे. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर टीम इंडियाने युएईचा फक्त 57 रनवर ऑलआऊट केला आहे. भारताची टी-20 क्रिकेटमधली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. एखाद्या टीमला एवढ्या कमी स्कोअरवर ऑलआऊट करण्याची टीम इंडियाची ही पहिलीच वेळ आहे. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, यातल्या 3 विकेट तर त्याला एकाच ओव्हरमध्ये मिळाल्या.
कुलदीपने 2.1 ओव्हरमध्ये 7 रन देऊन 4 विकेट घेतल्या, तर शिवम दुबेला 3 विकेट घेण्यात यश आलं. याशिवाय बुमराह, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती यांना एक-एक विकेट मिळाली. युएईकडून आलिशान शरफू आणि मोहम्मद वसीम या ओपनरनी चांगली सुरूवात केली. शरफूने 22 आणि वसीमने 19 रन केले, पण यानंतर युएईच्या एकाही बॅटरला दोन आकडी धावसंख्या करता आली नाही.
advertisement
युएईने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग टीम इंडियाने 4.3 ओव्हरमध्येच केला. अभिषेक शर्माने 16 बॉलमध्ये 30 रन केल्या. तर शुभमन गिलने 9 बॉलमध्ये नाबाद 20 आणि सूर्यकुमार यादवने 2 बॉलमध्ये नाबाद 7 रन केले.
टीम इंडियाने दाखवली खिलाडू वृत्ती
या सामन्यात टीम इंडियाने खिलाडू वृत्ती दाखवली. मॅचच्या 13 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर जुनैद सिद्दीकीने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण शिवम दुबेने टाकलेला बाऊन्सर सिद्दीकीच्या बॅटलाच लागला नाही, त्यामुळे बॉल विकेट कीपर संजू सॅमसनच्या हातात गेला आणि त्याने थ्रो करून स्टम्प उडवला, यानंतर टीम इंडियाने अपील केलं आणि अंपायरने थर्ड अंपायरला निर्णय घ्यायला सांगितलं. रिप्लेमध्ये सिद्दीकी क्रीजच्या बाहेर असल्याचं दिसत होतं, त्यामुळे थर्ड अंपायरने सिद्दीकीला आऊट दिलं.
advertisement
शिवम दुबेचा टॉवेल पडलेला सिद्दीकीने पाहिला, यानंतर सिद्दीकने दुबेकडे पाहून तुझा टॉवेल पडल्याचा इशारा केला, पण हे करत असताना सिद्दीकी शॉट खेळल्यानंतर त्याची बॅट क्रीजमध्ये ठेवायचं विसरला, तेव्हाच संजूने थ्रो केला, त्यामुळे थर्ड अंपायरने सिद्दीकीला आऊट दिलं. मैदानामध्ये झालेला हा गोंधळ पाहून टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने खिलाडूवृत्ती दाखवली आणि अपील मागे घेतलं.
advertisement
टीम इंडियाने अपील मागे घेतल्यानंतरही सिद्दीकाला याचा फायदा उचलता आला नाही. शिवम दुबेने पुढचा बॉल वाईड टाकला आणि त्यानंतर लगेचच पुढच्या बॉलवर सिद्दीकी आऊट झाला. अखेर शिवम दुबेनेच सिद्दीकीची विकेट घेतली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 10:29 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs UAE : थर्ड अंपायरने आऊट दिलं, तरी पुढचा बॉल खेळला... भारत-युएई सामन्यात मोठा ड्रामा, Live Video