मोहसिन नक्वीच्या तावडीतून आशिया कपच्या ट्रॉफीची सुटका, भारतात कधी येणार? समोर आली मोठी अपडेट
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
asia cup trophy Ind vs Pak आशिया कपच्या ट्रॉफीची अखेर मोहसिन नक्वीच्या तावडीतून सुटका झाली आहे. तसंच ट्रॉफी भारतात कधी परत येणार? याबाबतची माहितीही समोर आली आहे.
दुबई : आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भारताने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे तसंच आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) प्रमुख मोहसिन नक्वी याच्याकडून ट्रॉफी आणि विजेतेपदाची पदकं स्वीकारायला नकार दिला, यानंतर मोहसिन नक्वी मैदानातूनच ट्रॉफी आणि भारतीय खेळाडूंची पदकं घेऊन पळून गेला. मोहसिन नक्वीने आशिया कपची ट्रॉफी आणि पदकं स्वत:च्या ताब्यात घेतली, ज्यावरून मोठा वाद झाला. भारतीय खेळाडूही आशिया कपच्या ट्रॉफीशिवाय भारतामध्ये परत आले.
आशिया कपच्या या ट्रॉफीबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आशिया कपची ट्रॉफी एसीसीच्या दुबईमधील ऑफिसमध्ये पोहोचली आहे, अशी माहिती सूत्रांनी सीएनएन न्यूज 18 ला दिली आहे. आशिया कपची ट्रॉफी औपचारिकरित्या भारतात पाठवली जाईल किंवा दुबईमध्ये एखाद्या भारतीय अधिकाऱ्याला दिली जाईल आणि हा अधिकारी ट्रॉफी घेऊन भारतात परत येईल.
मोहसिन नक्वीविरोधात महाभियोग
advertisement
बीसीसीआयने मोहसिन नक्वीला एसीसी अध्यक्षपदावरून हटवण्याची तयारी सुरू केली आहे. नक्वीला हटवण्यासाठी महाभियोगाची प्रक्रिया चालवण्याचा विचारही बीसीसीआय करत असल्याची माहिती समोर येत आहे. मंगळवारी झालेल्या एसीसीच्या बैठकीतही मोहसिन नक्वीविरोधात बीसीसीआयने कठोर भूमिका घेतली. बीसीसीआयकडून आशिष शेलार आणि राजीव शुक्ला या बैठकीत सहभागी झाले होते.
मोहसिन नक्वी हा पाकिस्तानमधल्या शाहबाज शरीफ सरकारमध्ये गृहमंत्री आहे. याचसोबत तो पीसीबीचा अध्यक्षही आहे. आशिया कपच्या फायनलमध्ये भारताने विजय मिळवल्यानंतर खेळाडूंनी नक्वीकडून ट्रॉफी घ्यायला नकार दिला होता, यानंतर नक्वी ट्रॉफी घेऊन निघून गेला.
advertisement
नक्वीने नियम-कायदे तोडले
मोहसिन नक्वीच्या या कृत्याविरोधात बीसीसीआयने तीव्र निषेध नोंदवला, तसंच याची तक्रार आयसीसीकडे करणार असल्याचंही स्पष्ट केलं. एसीसी प्रमुख असताना मोहसिन नक्वीने निष्पक्षतेच्या आचारसंहितेचा भंग केला आहे. नक्वी दुहेरी भूमिकेत असल्यामुळे परस्पर हितसंबंध जोपासले जात आहेत, ज्यामुळे क्रिकेटचं राजकारण होत आहे, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2025 5:22 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
मोहसिन नक्वीच्या तावडीतून आशिया कपच्या ट्रॉफीची सुटका, भारतात कधी येणार? समोर आली मोठी अपडेट