Mumbai Indians : लागोपाठ 5 वर्ष एकही ट्रॉफी नाही... 5 कारणांमुळे बुडाली मुंबईची नौका!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2025 च्या क्वालिफायर-2 मध्ये पंजाब किंग्सने मुंबईला पराभवाचा धक्का दिला. या पराभवासोबतच मुंबई इंडियन्सचं यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलं आहे.
मुंबई : आयपीएल 2025 च्या क्वालिफायर-2 मध्ये पंजाब किंग्सने मुंबईला पराभवाचा धक्का दिला. या पराभवासोबतच मुंबई इंडियन्सचं यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. 2013 ते 2020 या काळात 5 ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सना मागच्या 5 वर्षात एकही ट्रॉफी जिंकता आली नाही, त्यानंतर मुंबईने मागच्या मोसमात हार्दिक पांड्याला टीमचं कर्णधार केलं, पण मागच्या मोसमात मुंबई शेवटच्या क्रमांकावर राहिली, तर या हंगामात मुंबईला प्ले-ऑफपर्यंत मजल मारता आली.
2025 च्या आयपीएलआधी खेळाडूंचा मेगा लिलाव पार पडला, या लिलावामध्ये मुंबईने धमाकेदार खेळाडूंना टीममध्ये संधी दिली. मुंबईचे हे खेळाडू बघता ही टीम आयपीएल ट्रॉफी जिंकू शकते, असं वाटत होतं पण यंदाही त्यांचं स्वप्न भंगलं. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईला ट्रॉफी न मिळण्यामागे काही कारणं आहेत.
रोहित शर्माचं सातत्य नाही
आयपीएलच्या या मोसमात रोहित शर्मा मुंबईचा दुसरा सर्वाधिक रन करणारा खेळाडू ठरला. रोहितने 15 सामन्यांमध्ये 29.86 ची सरासरी आणि 149.28 च्या स्ट्राईक रेटने 418 रन केले, यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश होता. रोहितने या मोसमात 400 रनचा टप्पा ओलांडला असला तरी सुरूवातीचे काही सामने आणि शेवटच्या काही सामन्यांमध्ये रोहितची बॅट शांतच राहिली, ज्याचा फटका मुंबईला बसला. पंजाबविरुद्धच्या क्वालिफायर-2 च्या सामन्यातही रोहित 8 रनवर आऊट झाला.
advertisement
खेळाडूंनी सोडली साथ
भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने यंदाची आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित केली गेली, त्यानंतर नव्या वेळापत्रकासह आयपीएलचे उरलेले सामने खेळवले गेले, पण स्पर्धेला उशीर झाला, त्यामुळे रेयान रिकलटन, विल जॅक्स आणि कॉर्बिन बॉश हे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी निघून गेले, त्यामुळे मुंबईला त्यांच्या विजयी टीम कॉम्बिनेशनमध्ये बदल करावा लागला.
advertisement
तिलक वर्माचा संघर्ष
मागच्या काही मोसमांमध्ये तिलक वर्मा मुंबईच्या मिडल ऑर्डरचा आधार बनला होता, पण यावेळी मात्र त्याच्या बॅटमधून फार रन निघाले नाहीत. तिलक वर्माने 16 सामन्यांमध्ये 31.18 च्या सरासरीने आणि 138.30 च्या स्ट्राईक रेटने 343 रन केल्या, यात त्याने 2 अर्धशतकं केली. या मोसमातल्या एका सामन्यात तर तिलक वर्माला रनही काढता येत नव्हत्या त्यामुळे त्याला रिटायर आऊट करण्याचा निर्णय मुंबईने घेतला होता.
advertisement
हार्दिकचा इम्पॅक्ट नाही
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यालाही यंदाच्या आयपीएलमध्ये मोठा इम्पॅक्ट पाडता आला नाही. हार्दिक या मोसमात 15 सामने खेळला त्यात त्याने 24.89 ची सरासरी आणि 163.50 च्या स्ट्राईक रेटने 224 रन केले. तर बॉलिंगमध्ये हार्दिकने 15 सामन्यांमध्ये 9.77 च्या इकोनॉमी रेटने 14 विकेट घेतल्या.
दोनच भारतीय चमकले
कोणतीही आयपीएल टीम त्यांच्याकडे असलेल्या भारतीय खेळाडूंच्या जीवावर स्पर्धा जिंकते. आरसीबी आणि पंजाब किंग्सही या मोसमात त्यांच्या भारतीय खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे प्ले-ऑफमध्ये पोहोचल्या आहेत, पण मुंबईकडून मात्र फक्त सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह हे दोनच भारतीय खेळाडू चमकले. यंदाच्या मोसमात बुमराह 12 सामनेच खेळला, ज्यात त्याने 6.67 चा इकोनॉमी रेट आणि 17.55 च्या सरासरीने 18 विकेट घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट मुंबईचा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला. बोल्टने 16 सामन्यांमध्ये 22 विकेट मिळवल्या. तर बॅटिंगमध्ये एकट्या सूर्याची जादू चालली. सूर्याने 16 सामन्यांमध्ये 65.18 च्या सरासरीने आणि 167.91 च्या स्ट्राईक रेटने तब्बल 717 रन केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 02, 2025 6:11 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : लागोपाठ 5 वर्ष एकही ट्रॉफी नाही... 5 कारणांमुळे बुडाली मुंबईची नौका!