काँग्रेस सरकारमध्ये पहिला मुस्लीम मंत्री, माजी कर्णधार पहिल्यांदाच घेणार मंत्रिपदाची शपथ
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
विधान परिषद आमदार आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीन यांना तेलंगणा सरकारमध्ये मंत्री करण्यात येणार आहे. त्यामुळे 31 ऑक्टोबर 2025ला (शुक्रवारी) राजभवनात त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
Mohammad Azharuddin Telanagana Government : तेलंगणा सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात विधान परिषद आमदार आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीन यांना तेलंगणा सरकारमध्ये मंत्री करण्यात येणार आहे. त्यामुळे 31 ऑक्टोबर 2025ला (शुक्रवारी) राजभवनात त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. अझहरुद्दीन यांना मंत्रिपद देण्यामागे 11 नोव्हेंबरला पार पडणाऱ्या जुबली हिल्स विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचं कारण सांगितलं जातं. कारण या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या सुमारे 30 टक्के आहे.त्यामुळे अझहरुद्दीन यांना कॅबिनेटमध्ये घेऊन काँग्रेसला मोठा फायदा होणार आहे, असे बोलले जात आहे.
खरं तर अझहरुद्दीन यांनी 2023 मध्ये ह्याच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता.त्यानंतर सध्या तेलंगणा काँग्रेस सरकारमध्ये एकही मुस्लिम मंत्री नव्हता. त्यामुळे मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व न दिल्याबद्दल सरकारवर प्रचंड टीका होत होती. पण आता जर अझहरुद्दीन मंत्री झाले तर या टीकांना पुर्णविराम मिळेल आणि काँग्रेसलाही याचा मोठा फायदा होणार आहे. अशाप्रकारे तेलंगणा सरकारच्या मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या कॅबिनेटमधील एकूण मंत्र्यांची संख्या 16 होईल, तर राज्यात कमाल 18 मंत्री असू शकतात.
advertisement
काँग्रेसला नेमका फायदा काय?
जुबली हिल्स विधानसभा मतदारसंघात दर तिसरा मतदार मुस्लिम आहे. या मतदारसंघात सुमारे 3.90 लाख मतदार आहेत, त्यापैकी 1.20 ते 1.40 लाख मतदार मुस्लिम समाजातील आहेत. म्हणजेच इथले सुमारे 30 टक्के मत मुस्लिमांचे आहेत. त्यामुळे या भागात मुस्लिम मतदार निवडणुकीचा निकाल ठरवण्यात निर्णायक भूमिका बजावतात. ज्याला मुस्लिम मतांचा पाठिंबा मिळतो, त्या पक्षाच्या विजयाची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे काँग्रेसने अझहरुद्दीन यांना मंत्री बनवून मुस्लिम समाजात आपला विश्वास अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.
advertisement
काँग्रेसने जरी हा निर्णय घेतला असला तरी यावेळी पोटनिवडणुकीत कोणताही मुस्लिम उमेदवार नाही. आमदार गोपीनाथ यांच्या निधनानंतर जुबली हिल्स मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. बीआरएसकडून मंगंती सुनीता गोपीनाथ, काँग्रेसकडून वल्लाला नवीन यादव आणि भाजपकडून लंकला दीपक रेड्डी हे उमेदवार रिंगणात आहेत. या वेळी तिन्ही मोठ्या पक्षांकडून एकही मुस्लिम उमेदवार नाही.त्यामुळे काँग्रेस उमेदवाराला या निर्णयाचा किती फायदा होतो? हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
advertisement
अझहरुद्दीनचा पराभव
अझहरुद्दीन यांनी 2023 च्या विधानसभा निवडणुकीत जुबली हिल्स मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र ते बीआरएसचे उमेदवार मंगंती गोपीनाथ यांच्याकडून 16,337 मतांनी पराभूत झाले. बीआरएस उमेदवाराला 80,549 मते मिळाली, तर अझहरुद्दीन यांना 64,212 मते मिळाली होती.
2023 मध्ये काँग्रेसला बहुमत
तेलंगणामध्ये 2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील एकूण 119 जागांपैकी काँग्रेसने 64 जागा जिंकल्या, तर सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला (BRS) 39 जागा मिळाल्या. भाजपला 8, एआयएमआयएमला 7 आणि सीपीआयला 1 जागा मिळाली होती.
advertisement
दरम्यान मोहम्मद अझहरुद्दीन यांनी भारतीय संघासाठी 99 कसोटी सामने खेळले आहेत. ते 100वा कसोटी सामना खेळणार असतानाच त्यांच्यावर सामनाफिक्सिंगचे आरोप झाले. त्यानंतर 2000 मध्ये बीसीसीआयने चौकशीनंतर अझहरुद्दीन यांना आजीवन बंदी घातली. मात्र 2012 मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 29, 2025 7:33 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
काँग्रेस सरकारमध्ये पहिला मुस्लीम मंत्री, माजी कर्णधार पहिल्यांदाच घेणार मंत्रिपदाची शपथ


