वडिलांनी नाकारलं,मिळेल तिथं काम केलं! एका निर्णयाने आयुष्य बदललं, अमरावतीच्या भारती या शेतीतून करताय लाखोंची कमाई
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : अवघ्या सात महिन्यांची असतानाच वडिलांनी आईसह तिला सोडून दिलं. आयुष्याच्या सुरुवातीलाच आलेला हा धक्का कुठल्याही मुलीला मोडून काढणारा ठरू शकतो.
मुंबई : अवघ्या सात महिन्यांची असतानाच वडिलांनी आईसह तिला सोडून दिलं. आयुष्याच्या सुरुवातीलाच आलेला हा धक्का कुठल्याही मुलीला मोडून काढणारा ठरू शकतो. मात्र अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातल्या करजगाव गावात राहणाऱ्या भारती पोहोरकरनं परिस्थितीसमोर कधीही गुडघे टेकले नाहीत.
आजी-आजोबांची माया आणि एक एकर शेतीचा आधार
आईसोबत आजोळी आलेल्या भारतीला आजी शांताबाई किसनराव भोगे आणि आजोबा किसनराव नागोजी भोगे यांनी मायेची उब दिली. त्यांच्याकडे केवळ एक एकर शेती होती. या मर्यादित साधनांवर त्यांनी मुलगी आणि नातीचं संगोपन केलं. गरीबी, अडचणी आणि संघर्ष असतानाही कष्ट आणि संस्कारांच्या बळावर त्यांनी भारतीचं भविष्य घडवलं. आज आजी-आजोबा हयात नसले, तरी त्यांनी दिलेली शेती आणि मूल्यं तिच्या यशाचा पाया ठरली आहेत.
advertisement
उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि अपयशाचा सामना
भारती पोहोरकरनं अमरावती शहरात वाणिज्य शाखेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. पुढे स्पर्धा परीक्षांचा प्रयत्न केला, मात्र अपेक्षित यश मिळालं नाही. काही काळ उपजीविकेसाठी तिनं पेट्रोल पंपावर नोकरीही केली. तरीही लहानपणापासून शेतीशी असलेलं नातं कधीच तुटलं नाही.
शेतीकडे वळलेली वाट, नव्या सुरुवातीचा निर्णय
अपयशानंतरही खचून न जाता भारतीनं शेतीकडे वळण्याचा ठाम निर्णय घेतला. “या शेतातूनच माझ्या आयुष्याला नवी दिशा मिळाली,” असं ती सांगते. सुरुवातीला एक एकर शेतीत भाजीपाला लागवड करून तिनं स्वतःवर विश्वास निर्माण केला.
advertisement
भाजीपाला ते संत्रा बागेपर्यंतचा प्रवास
भाजीपाल्यातून मिळालेल्या उत्पन्नानंतर चांदूरबाजार कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आणि अनुभवी शेतकऱ्यांच्या सल्ल्याने भारतीनं संत्रा लागवडीचा धाडसी निर्णय घेतला. अवघ्या तीन-चार वर्षांत एक एकर शेतात १४० संत्र्याची झाडं उभी राहिली. सुरुवातीच्या काळात मिरची व कांदा आंतरपीक घेत खर्च भागवण्यात आला. सेंद्रिय खत, जैविक कीटकनाशकांचा वापर करून जमिनीची सुपीकता जपली.
advertisement
काटेकोर नियोजनातून सात लाखांचं उत्पादन
योग्य नियोजन, वेळेवर फवारणी आणि मेहनतीमुळे यावर्षी मृग बहार धरलेल्या संत्रा बागेचं उत्पादन थेट सात लाख रुपयांना विकलं गेलं. ही बाग केवळ आर्थिक उत्पन्न देणारी नाही, तर आई-लेकीसाठी आत्मविश्वास देणारी ठरली आहे.
महिला शेतकरी म्हणून संघर्षाची लढाई
महिला शेतकरी म्हणून काम करताना अनेक अडचणी आल्या. वेळेवर मजूर न मिळाल्यामुळे पाणी देणं, खत टाकणं, फवारणी यांसारखी बहुतेक कामं भारतीनं स्वतः आईसोबत केली. आवश्यक तेवढ्याच कामांसाठी मजूर लावले.
advertisement
आईच्या डोळ्यात आनंदाश्रू
आज सात लाखांचं उत्पन्न पाहून ६८ वर्षांच्या सुमित्रा पोहोरकर यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात. “माझी मुलगी सर्व कामं स्वतः करते. तिच्या कष्टामुळे आज मला सुखाचे दिवस पाहायला मिळाले,” असं त्या अभिमानाने सांगतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 7:26 AM IST
मराठी बातम्या/Success Story/
वडिलांनी नाकारलं,मिळेल तिथं काम केलं! एका निर्णयाने आयुष्य बदललं, अमरावतीच्या भारती या शेतीतून करताय लाखोंची कमाई





