Success Story: 50 हजार कोंबड्या अन् 1, 00,00,000 रुपयांची उलाढाल, ग्रामीण तरुणाची यशोगाथा
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Success Story: ऑरगॅनिक पद्धतीने शेती करणारे अनेक शेतकरी देखील अविनाशचे ग्राहक आहेत. हे शेतकरी पोल्ट्री फार्ममधून कोंबडी खत खरेदी करतात.
सोलापूर: व्यवसायाची पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीला स्वत:चा व्यवसाय उभा करण्यात असंख्य अडचणी येतात. त्यामुळे काहीजण हा प्रयत्न अर्ध्यातूनच सोडून देतात. पण, काहीजण प्रचंड आशावादी असतात. अशा व्यक्तींना, आपल्या कष्टाच्या आणि चिकाटीच्या बळावर यश मिळते. मोहोळ तालुक्यातील अनगर गावचा रहिवासी असलेला 'अविनाश मोहन झुंजकर' या तरुणाचा अशाच व्यक्तींमध्ये समावेश होतो. नोकरीपेक्षा काहीतरी चांगला पर्याय असावा या उद्देशाने त्याने पोल्ट्री फार्मचा व्यवसाय सुरू केला आणि त्याला प्रचंड यश मिळालं.
अविनाशने डीएडपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. नोकरी करण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय सुरू केला तर जास्त फायदा होऊ शकतो, हा विचार करून त्याने 2017मध्ये पोल्ट्री फार्मचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्याने 200 बॉयलर कोंबड्या पाळल्या होत्या. व्यवसाय सुरू केल्यानंतर अविनाशने या व्यवसायाचं मार्केटिंग केलं. गावांमध्ये आणि दुकानांमध्ये जाऊन आपल्या व्यवसायाची जाहिरात केली. त्यामुळे हळूहळू अविनाशकडे असलेल्या बॉयलर कोंबड्यांची मागणी वाढत गेली.
advertisement
अविनाशने जेव्हा पोल्ट्री व्यवसाय सुरू केला होता तेव्हा त्याच्याकडे एक शेड आणि 200 कोंबड्या होत्या. सध्या त्याच्याकडे 11 शेड असून त्या शेडमध्ये 50 हजार पेक्षा जास्त कोंबड्या आहेत. साधारणतः दहा ते बारा दिवसांमध्ये बॉयलर कोंबड्या विक्रीसाठी तयार होतात. या व्यवसायातून उच्चशिक्षित असलेला अविनाश एक कोटी रुपयांची उलाढाल करत आहे.
advertisement
अविनाशच्या पोल्ट्रीमध्ये असलेल्या कोंबड्या सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक, हैदराबाद आणि मुंबई या ठिकाणी देखील पाठवल्या जातात. ऑरगॅनिक पद्धतीने शेती करणारे अनेक शेतकरी देखील अविनाशचे ग्राहक आहेत. हे शेतकरी पोल्ट्री फार्ममधून कोंबडी खत खरेदी करतात. या खतामधूनही अविनाशला चांगले उत्पन्न मिळते.
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. सुरुवातीला अडचणी येतील पण एक दिवस त्याच व्यवसायातून नोकरीपेक्षाही अधिक उत्पन्न मिळेल, असा सल्ला अविनाश झुंजकरने तरुणांना दिला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
August 11, 2025 4:15 PM IST
मराठी बातम्या/Success Story/
Success Story: 50 हजार कोंबड्या अन् 1, 00,00,000 रुपयांची उलाढाल, ग्रामीण तरुणाची यशोगाथा