Murbad News: मुरबाडमधील उड्डाण पूल गावकऱ्यांसाठी ठरतोय डोकेदुखी, नियोजन शून्य कारभारामुळे नागरिक त्रस्त
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मुरबाडच्या प्रवेशद्वारावरच केंद्र सरकारकडून राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी उभारण्यात आलेला लांबलचक पूल नागरिकांची डोकेदुखी ठरतोय. काही मिनिटांच्या अंतरासाठी नागरिकांना वळसा घालून शहरात जावे लागते.
मुरबाड शहराच्या सीमेवरच केंद्र सरकारकडून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाअंतर्गत उभारण्यात आलेला लांबलचक पूल नागरिकांची डोकेदुखी ठरला आहे. कल्याणवरून मुरबाडला जाताना मुरबाड शहराच्या प्रवेशद्वारावरच हा पूल उभारण्यात आला आहे. या पूलामुळे मुरबाडकरांचा वेळ वाचला नसून त्यांना वळसा घालून शहरामध्ये यावे लागते आहे. हा पूल मुरबाडकरांसाठी दिलासादायक ठरण्याऐवजी डोकेदुखी ठरतोय. चुकीच्या नियोजनांमुळे नागरिकांना फार मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. नागरिकांसह व्यापाऱ्यांकडूनही या पूलाला कडाडून विरोध केला जात आहे.
तीनहात नाका आणि म्हसा नाका येथील क्रॉसिंग वगळता या उड्डाणपुलाला एकही पर्यायी बायपास मार्गिका ठेवण्यात आलेली नाही. उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागांमध्ये हातगाड्या, टपरीवाले, पार्किंग केलेली वाहने तसेच अनधिकृत खासगी प्रवासी गाड्यांनी अक्षरशः ठाण मांडले. यामुळे उड्डाणपुलाचा लाभ शहरवासीयांना मिळण्याऐवजी शहरातल्या बाहेरच्या नागरिकांना मिळतो. विशेष म्हणजे, उड्डाण पुलाच्या नियोजन टप्प्यात काही ठिकाणी बायपास मार्गिका तयार करण्याची आवश्यकता होती. मात्र, आता त्या शक्य नसल्याने पुन्हा कोट्यवधी रूपयांचा खर्च आणि दीर्घकालीन प्रतीक्षा अटळ ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत.
advertisement
या उड्डाणपूलामुळे बाजारपेठांवर आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. छोटे व्यावसायिक, हातावर पोटाची खळगी भरणाऱ्यांवर आर्थिक संकट येण्याची मोठी भिती आहे. यामुळे स्थानिक बाजारपेठेचे आर्थिक चक्र मंदावण्याची शक्यता आहे. उड्डाणपूलावरील वाहने शहराच्या बाहेरच वळवली जात आहे. त्यामुळे ग्राहकवर्ग कमी होण्याची शक्यता आहे. नागरिक मुरबाड शहरातील बाजारपेठेत न जाता, टोकावडे, सरळगांव किंवा शिवळे याठिकाणच्या बाजारात जातील. यामुळे दुकानदार, व्यापारी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे रोजगार हातातून निसटण्याची शक्यता आहे. या उड्डाणपूलाला सर्वच स्तरातून सध्या विरोध केला जात आहे. फक्त अर्थकारणच नाही तर, इतरत्र गोष्टींचाही मुद्दा उपस्थित होत आहे.
advertisement
पूर्वनियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील नागरिकांना जर, आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांची गरज पडल्यास मार्ग कसा उपलब्ध होणार? याचे ठोस उत्तर प्रशासनाला द्यावे लागणार आहे. शहरातील सोनारपाडा, मातानगर, गणेशनगर, देवीची आळी, देवगाव रोड आणि विद्यानगर परिसरातील नागरिकांना घराजवळ पोहोचण्यासाठी ब्रिजला वळसा मारावा लागत आहे. वाढलेली वाहतूक, इंधन खर्च आणि पायपीट यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे सांगत आहेत.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 7:45 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Murbad News: मुरबाडमधील उड्डाण पूल गावकऱ्यांसाठी ठरतोय डोकेदुखी, नियोजन शून्य कारभारामुळे नागरिक त्रस्त










