डॉग टॅक्सच्या माध्यमातून झाली 3866 कोटी रुपयांची कमाई; 'या' देशात टॅक्स न भरल्यास होतो गुन्हा दाखल
- Published by:Shrikant Bhosale
- trending desk
Last Updated:
वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या गोष्टींवर टॅक्स लागू केला जातो. जर्मनी या देशामध्ये कुत्रा पाळल्यानंतर टॅक्स (कर) भरावा लागतो. स्थानिक भाषेत त्याला 'हुंडेशटॉयर' म्हणतात. या टॅक्समधून जर्मनीला भरपूर महसूल मिळतो.
नवी दिल्ली : कर हा सरकारच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असतो. वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या गोष्टींवर टॅक्स लागू केला जातो. जर्मनी या देशामध्ये कुत्रा पाळल्यानंतर टॅक्स (कर) भरावा लागतो. स्थानिक भाषेत त्याला 'हुंडेशटॉयर' म्हणतात. या टॅक्समधून जर्मनीला भरपूर महसूल मिळतो. या वर्षी जर्मनीने डॉग टॅक्सच्या माध्यमातून 3866 कोटी रुपयांची कमाई केली आहे. गेल्या वर्षीही जर्मनीला या टॅक्समधून जवळपास एवढीच रक्कम मिळाली होती.
जर्मनीतील विविध नगरपालिका श्वानमालकांकडून कर वसूल करतात. हा कर श्वान पाळण्यासाठी वसूल केला जातो. जर्मनीमध्ये श्वान पाळण्याचं प्रमाण खूप आहे. प्रत्येक घरात एक किंवा दोन श्वान असतात. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तेथील सरकार विविध प्रजातींच्या श्वानांसाठी वेगवेगळा कर आकारते. कराच्या बदल्यात श्वानांना टॅग किंवा ओळखीसाठी क्रमांक दिला जातो. इतर अनेक देशांमध्येही असे कर लादले जात असले तरी जर्मनीमध्ये त्याची व्याप्ती जास्त आहे.
advertisement
ऑस्ट्रियामध्ये देखील श्वानांच्या मालकांना आपल्या पाळीव प्राण्यांची नोंदणी करावी लागते. स्वित्झर्लंडमध्ये देखील असा कर आकारला जातो. नेदरलँडमधील अनेक नगरपालिका श्वानांसाठी वेगवेगळे कर आकारतात. भारतातही जानेवारी 2023 मध्ये अशा प्रकारच्या कराची संकल्पना मांडण्यात आली होती. पण, लागू होऊ शकली नाही.
जर्मनीमध्ये कसा आकारला जातो डॉग टॅक्स
जर्मनीमध्ये श्वान पाळण्यासाठी नागरिकाला एकतर ब्रीडरकडे जावं लागतं किंवा ॲनिमल शेल्टरमधून श्वान दत्तक घ्यावा लागतो. अनेक लोक परदेशात श्वान दत्तक घेऊन जर्मनीत आणतात. यासाठी बरंच डॉक्युमेंटेशन करावं लागतं. श्वानमालक ज्या भागात राहतो तेथील नगरपालिका वार्षिक कर वसूल करते. पाळीव मांजर या कराच्या कक्षेत येत नाही. संपूर्ण देशात कराची रक्कम सारखी नाही. प्रत्येक नगरपालिकेचा कर वेगळा आहे. घरातील श्वानांची संख्या किंवा प्रजातीनुसार कराची रक्कम बदलू शकते.
advertisement
मादी श्वानाला पिलं झाल्यास करावे लागते नोंदणी
जर्मन पेट सर्व्हिस वेबसाइट्सवरील माहितीनुसार, जर तुम्ही श्वान घरी आणला तर त्याची नोंदणी करावी लागते. श्वानाने पिलांना जन्म दिला तर तीन महिन्यांत त्याची नोंदणी करावी लागते. श्वानाचं पिलू घरी आणलं पुढील तीन महिन्यांत त्याची नोंदणी करावी लागते. घरी आणलेला श्वान प्रौढ असेल तर तीन ते चार आठवड्यांच्या दरम्यान त्याची नोंदणी करावी लागते. सहसा घराजवळचं नगरपालिका कार्यालय किंवा टाऊन हॉलमध्ये जाऊन ही नोंदणी करता येते. काही शहरे आणि नगरपालिकांमध्ये ऑनलाइन नोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे.
advertisement
जर तुमच्याकडे श्वान असेल आणि त्याची नोंदणी झालेली नसेल किंवा टॅक्स भरला नसेल तर तुम्हाला गुन्हेगार ठरवलं जाऊ शकतं. श्वानाची टॅक्स ऑफिसमध्ये नोंदणी केल्यानंतर 'डॉग टॅग' मिळतो. जेव्हा श्वान घराबाहेर जातो तेव्हा त्याच्या शरीरावर हा टॅग लावणे बंधनकारक आहे.
घर शिफ्ट केल्यानंतर द्यावी लागते माहिती
जर एखादी व्यक्ती नवीन ठिकाणी स्थलांतरित होत असेल तर नोंदणीकृत श्वानाची माहिती संबंधित विभागाला द्यावी लागते. श्वान बेपत्ता झाला किंवा मेला तरी त्याची माहिती विभागाला देणं गरजेचं आहे. करातून मिळालेले पैसे पाळीव प्राण्यांशी संबंधित सेवांवर खर्च करणे, बंधनकारक नाही. नगरपालिका विविध सामुदायिक सेवांसाठी देखील हे पैसे खर्च करू शकते.
advertisement
कर का घेतला जातो?
फिरणे हा सर्व श्वानांच्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग आहे. सकाळ-संध्याकाळ घराबाहेर पडल्याशिवाय श्वान शांत बसत नाहीत. ते मलविसर्जनही घराबाहेर पडल्यानंतरच करतात. जवळपास सर्वच श्वान सार्वजनिक ठिकाण मलविसर्जन करतात. जर्मनीतील श्वान मालक ही विष्ठा पिशव्यांमध्ये भरून विशिष्ट कचराकुंड्यांमध्ये टाकतात. तसा तिथे नियम करण्यात आलेला आहे.
यासंबंधित पालिका जी स्वच्छता करते, त्याची भरपाई कराच्या माध्यमातून होते. जर्मनीमधील सर्व श्वान मालकाच्या घरतात राहतात. जे श्वान भटके आहेत त्यांच्यासाठी शेल्टर होम तयार करण्यात आलेले आहेत. तिथे रस्त्यावर श्वान फिरताना दिसत नाहीत. एखादा श्वान सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसल्यास त्याला शेल्टर होममध्ये पोहचवलं जातं. करामुळे श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याच्या कामात प्रशासनाला मदत होते.
advertisement
भारतातील काही नगरपालिका घेतात डॉग टॅक्स
भारतातही काही महापालिकांनी डॉग टॅक्स सुरू केला आहे. गेल्या वर्षी मध्य प्रदेशातील सागर शहरातील महानगरपालिकेने श्वान पाळणाऱ्यांवर कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. शहराची स्वच्छता आणि लोकांची सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे, असं सांगण्यात आलं होतं. या पूर्वी बडोदा महापालिकेनेही 'डॉग टॅक्स' लावला होता. अगोदर प्रत्येक श्वानामागे वार्षिक 500 रुपये आकारले जात होते. मात्र, लोकांचा थंड प्रतिसाद बघून पाहून पालिकेने आता तीन वर्षांसाठी एक हजार रुपये आकारण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली महानगरपालिकेने श्वानांच्या करासाठी रक्कम निश्चित केली आहे. मात्र, तिथे हा नियम नीट पाळला जात नाही.
advertisement
सर्वाधिक पाळीव श्वान कोणत्या देशात आहेत?
अमेरिका: सर्वात जास्त पाळीव श्वान युनायटेड स्टेट्समध्ये आहेत. जिथे अंदाजे नऊ कोटी पाळीव श्वान आहेत.
ब्राझील: या देशात सुमारे 5.5 कोटी पाळीव श्वान आहेत.
चीन: या देशात सुमारे 5.4 कोटी पाळीव श्वान आहेत. तिथे श्वान पाळण्याचा ट्रेंड वाढत आहे.
रशिया: या देशात सुमारे 1.7 कोटी पाळीव श्वान आहेत. याशिवाय तिथे भटक्या श्वानांची संख्याही जास्त आहे.
जपान: या देशात सुमारे 2 कोटी पाळीव श्वान आहेत. तेथील लोकांच्या मनात पाळीव प्राण्यांविषयी एक मजबूत सांस्कृतिक भावना आहे.
मेक्सिको: या ठिकाणी सुमारे 1.8 कोटी पाळीव श्वान आहेत.
युनायटेड किंग्डम: या देशात सुमारे 1.2 कोटी पाळीव श्वान आहेत. याठिकाणी श्वान पाळण्याची दीर्घकालीन परंपरा आहे.
फिलिपिन्स: रेबीज व्यवस्थापनाशी संबंधित आव्हाने असूनही या देशात सुमारे 1.1 कोटी पाळीव श्वान आहेत.
जर्मनी: इथे सुमारे 1.5 कोटी पाळीव श्वान आहेत.
भारत: आपल्या देशात सुमारे एक कोटी पाळीव श्वान आहे. शहरी भागात श्वान पाळण्याचा ट्रेंड वाढत आहे. याशिवाय, आपल्या देशात भटक्या श्वानांची संख्या लक्षणीय आहे.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
October 11, 2024 2:56 PM IST
मराठी बातम्या/Viral/
डॉग टॅक्सच्या माध्यमातून झाली 3866 कोटी रुपयांची कमाई; 'या' देशात टॅक्स न भरल्यास होतो गुन्हा दाखल