थेट शेतातून ग्राहकांच्या हातात! सांगलीत 5 दिवसांचा फळ महोत्सव, काय आहे खास?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Fruit Festival: शेतकऱ्यांनी पकवलेली फळे थेट ग्राहकांना मिळावीत, यासाठी सांगलीत फळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा फळ महोत्सव 5 दिवस असणार आहे.
सांगली: सांगली जिल्हा हा फळशेतीसाठी प्रसिद्ध आहे. येथील द्राक्ष, डाळिंब, केळी, पेरु, चिक्कू, पपई, सीताफळ उत्पादन संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहेत. या फळांचा शहरातील नागरिकांना आस्वाद घेता यावा, म्हणून सांगलीतील कल्पद्रुम मैदान नेमिनाथनगर येथे दि. 23 ते 27 फेब्रुवारी रोजी फळ महोत्सव घेण्यात येणार आहे. या महोत्सवात द्राक्षांचे विविध प्रकार ठेवले जाणार आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, कृषी विभाग, महाराष्ट्र कृषी पणन मंडळ-पुणे, राज्य महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ आणि फळ महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने 'फळ महोत्सव' होणार आहे.
सांगली, मिरज, कुपवाड शहरातील नागरिकांना चांगल्या प्रतीचे द्राक्ष, डाळींब, आंबा, केळी, पेरू, चिक्कू, पपई, ड्रॅगन फ्रूट, सीताफळ, स्ट्रॉबेरी आदी फळांचा आस्वाद घेता यावा, हा फळ महोत्सवामागील मुख्य उद्देश आहे. तसेच फळ महोत्सवात ब्लॅंक क्वीन बेरी, फ्लेम सिडलेस, आरके, ज्योती सिडलेस, थॉमसन, आरा 35, एसएसएन, सुपर सोनाका, विविध वाणांची द्राक्ष विक्रीसाठी शेतकरी घेऊन येणार आहेत. शेतकऱ्यांनी पकवलेली फळे थेट ग्राहकांना मिळावीत, हा प्रमुख हेतू फळ महोत्सवाचा आहे, अशी माहिती सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे व सचिव महेश चव्हाण यांनी दिली.
advertisement
फळ महोत्सवाची वैशिष्ट्ये
महिलांसाठी फळांपासून पाककला स्पर्धा, फळ सजावट स्पर्धा, फळांविषयक चित्रकला स्पर्धा, महिलांसाठी हळदी-कुंकू व होम मिनिस्ट स्पर्धा, शेती विषयक सांस्कृतिक कार्यक्रम, तरुण शेतकरी उद्योजक संधी व व्यवसाय मार्गदर्शन, मानवी आरोग्यास फळांचे महत्त्व या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
February 21, 2025 3:46 PM IST