'विठ्ठल' बळीराजाच्या मदतीला धावला! मंदिर समितीने पूरग्रस्त शेतकरी, महिलांसाठी घेतले २ मोठे निर्णय
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Maharashtra Flood : सोलापूर आणि मराठवाड्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांचे पीक, घरे, शेतजमीन वाहून गेली असून हजारो कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.
मुंबई : सोलापूर आणि मराठवाड्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांचे पीक, घरे, शेतजमीन वाहून गेली असून हजारो कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. या भीषण परिस्थितीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध स्तरातून पुढाकार घेतला जात आहे.
निर्णय काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मुख्यमंत्री सहायता निधीस १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मंदिर समितीने यासोबतच पूरग्रस्तांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, लाडूप्रसाद, फूड पॅकेट्स यांचे वाटप करण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. विशेष म्हणजे, पूरग्रस्त महिलांसाठी रुक्मिणी मातेची महावस्त्रे दिली जाणार आहेत.
advertisement
भीमा, सीना आणि माण नदीतून आलेल्या पुराचा तडाखा
सोलापूर जिल्ह्यातील भीमा, सीना आणि माण नद्यांना आलेल्या महापुरामुळे शेतकरी व सर्वसामान्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतातील काढणीवर आलेली पिके पाण्याखाली गेली आहेत, तर अनेक घरात गाळ साचल्याने नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. मराठवाड्यातही नद्यांना पूर आल्याने अनेक गावे जलमय झाली आहेत.
मंदिर समितीची मदत
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले की, पूरग्रस्त महिलांना रुक्मिणीमातेची महावस्त्रे प्रसादरूपाने वाटण्यात येतील. तसेच, पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि लाडूप्रसादाचे वाटप सातत्याने केले जाईल. मंदिर समितीने याआधीही आपत्तीच्या काळात मदतीचा हात दिला आहे.
advertisement
सातत्याने दिला मदतीचा हात
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने यापूर्वीही आपत्तीच्या काळात मुख्यमंत्री सहायता निधीस हातभार लावला आहे. २०१३, २०१५, २०१८ आणि २०२० मध्येही प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत मंदिर समितीकडून देण्यात आली होती. यंदाही १ कोटी रुपयांची मदत जाहीर करून समितीने सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम ठेवली आहे.
मंदिर समितीच्या सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली २६ सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभा घेण्यात आली. या सभेत मुख्यमंत्री सहायता निधीस १ कोटींची मदत तसेच रुक्मिणी मातेची महावस्त्रे प्रसादरूपाने पूरग्रस्तांना वाटण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी याची माहिती दिली.
advertisement
एकूणच, अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यात निर्माण झालेल्या संकटात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मदतीचा हात पुढे करून पुन्हा एकदा समाजाप्रतीची आपली जबाबदारी दाखवून दिली आहे. पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी ही मदत निश्चितच महत्त्वाची ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 8:41 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
'विठ्ठल' बळीराजाच्या मदतीला धावला! मंदिर समितीने पूरग्रस्त शेतकरी, महिलांसाठी घेतले २ मोठे निर्णय