शेतकऱ्यांना दरमहा मिळणार ३,००० रुपये, सरकारची खास योजना, अर्ज कसा अन् कुठे कराल?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : शेती हा आपल्या देशाचा कणा असला तरी लहरी हवामान, दुष्काळ, अतिवृष्टी आणि उत्पादनातील चढउतार यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कायमस्वरूपी निश्चित नसते. त्यातच वय वाढल्यावर शेतीत पूर्वीसारखे कष्ट घेणे शक्य होत नाही.
मुंबई : शेती हा आपल्या देशाचा कणा असला तरी लहरी हवामान, दुष्काळ, अतिवृष्टी आणि उत्पादनातील चढउतार यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कायमस्वरूपी निश्चित नसते. त्यातच वय वाढल्यावर शेतीत पूर्वीसारखे कष्ट घेणे शक्य होत नाही. अशावेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज भासते. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू केली असून, या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरमहा निवृत्तीवेतन मिळते.
योजनेची वैशिष्ट्ये
ही योजना विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे. यामध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3,000 रुपयांचे निवृत्तीवेतन मिळते. म्हणजेच वार्षिक 36 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. ही रक्कम औषधोपचार, घरगुती खर्च किंवा इतर गरजांसाठी उपयोगी पडते. त्यामुळे शेतकऱ्यांना उतारवयात आर्थिक स्थैर्य मिळते.
प्रीमियम किती भरावा लागतो?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मासिक हप्ता भरावा लागतो. हा हप्ता शेतकऱ्यांच्या वयानुसार 55 रुपये ते 200 रुपये इतका असतो. विशेष म्हणजे, जितक्या कमी वयात शेतकरी या योजनेत सामील होईल तितका त्याचा प्रीमियम कमी ठरतो. शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेइतकीच रक्कम केंद्र सरकार त्यांच्या खात्यात जमा करते. अशा प्रकारे, वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना निश्चित निवृत्तीवेतन मिळू लागते.
advertisement
अर्ज प्रक्रिया कशी?
योजनेसाठी शेतकऱ्यांनी जवळच्या महा ई-सेवा केंद्रावर जाऊन नोंदणी करावी लागते. अर्ज करताना आधार कार्ड, वयाचा दाखला आणि बँक पासबुक आवश्यक असते. नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या वयानुसार प्रीमियम निश्चित केला जातो आणि त्याप्रमाणे दरमहा ठराविक रक्कम जमा करावी लागते.
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
या योजनेमुळे शेतकऱ्यांना वयोमानानुसार उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणींना तोंड देणे सोपे होते. अनेक शेतकरी वृद्धापकाळात उत्पन्नाच्या अभावामुळे कर्जबाजारी होतात किंवा दैनंदिन खर्च भागवणे कठीण होते. मात्र, किसान मानधन योजनेतील 3 हजार रुपयांची पेन्शन त्यांना आर्थिक आधार देते.
advertisement
पंतप्रधान किसान मानधन योजना ही शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी सुरक्षिततेचे कवच आहे. कमी प्रीमियम, समान सरकारी योगदान आणि निश्चित निवृत्तीवेतन या तीन महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते. शेतकरी जितक्या लवकर या योजनेत सामील होतील तितका त्यांना अधिक फायदा होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2025 12:41 PM IST