राज्यात सोमवारी (ता. १३) सकाळपर्यंत अंशतः ढगाळ वातावरणासह उकाडा आणि उन्हाचा तडाखा कायम होता. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश तापमानाची नोंद झाली. सोलापूर आणि सांताक्रुझ येथेही ३४ अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदले गेले आहे.
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होत असून, आज (ता. १४) सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उर्वरित भागांमध्ये सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली येथेही तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
advertisement
काढणीला आलेल्या पिकांसाठी सल्ला
राज्यात सध्या अनेक ठिकाणी खरीप हंगामातील पिके जसे की सोयाबीन, मूग, उडीद, आणि तूर काढणीच्या टप्प्यात आली आहेत. हवामानात अचानक बदल होऊन विजांसह सरी येण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी खालील काळजी घेणे आवश्यक आहे.
धान्य कोठारात साठवा: काढणी झालेलं उत्पादन उघड्यावर ठेवू नये. धान्य छपराखाली किंवा प्लास्टिक शीटने झाकावीत.
कीड व रोग नियंत्रण: आर्द्रतेमुळे पिकांवर कीड व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो, त्यामुळे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.