भैरवनाथ आबासाहेब पवार हे पारंपरिक शेती करत होते. परंतु, ही शेती परवडत नसल्याने त्यांनी फळबागेची शेती करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदाच दीड एकरात ॲपल बोराची लागवड केली. दीड एकरात जवळपास 240 ते 250 ॲपल बोरांची झाडे लावली. लागवडीनंतर जवळपास सहा महिने झाले असून बोरं विक्रीसाठी बाजारात सुद्धा जात आहेत.
10 गुंठ्यात लागवड, तीन महिन्यात मिळालं 1 लाख उत्पन्न, शेतकऱ्यानं असं काय केलं?
advertisement
एक लाखाचा खर्च
ॲपल बोराच्या झाडांवर भुरी आणि अळी या रोगाचा प्रादुर्भाव जास्त असतो. वेळोवेळी झाडांची पाहणी करून योग्य त्या रित्या फवारणी केली. ॲपल बोराचे रोपं, फवारणी आणि इतर खर्च मिळून जवळपास या बागेला 1 लाख रुपयापर्यंत खर्च आला आहे. तर सर्व खर्च वजा करून ॲपल बोराच्या बागेतून अडीच लाख रुपयापर्यंतचा उत्पन्न मिळणार आहे, असं पवार सांगतात.
25 रुपये किलो दर
शेतकरी भैरवनाथ पवार हे सध्या सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बोरं विक्रीसाठी पाठवतात. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ॲपल बोराला 25 ते 27 रुपये किलो दर मिळत आहे. एकदा ॲपल बोर तोडणी सुरू झाली की ती जवळपास तीन महिने सुरू असते. तर एकदा लागवड केलेल्या ॲपल बोराच्या बागेतून आठ वर्ष उत्पन्न मिळतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांचे मागे न लागता आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करावेत आणि अधिकाधिक उत्पन्न घ्यावे, असा सल्ला पवार देतात.





