एक ते 15 नोव्हेंबर हा हरभरा पेरणीचा काळ आहे. परंतु यंदा पावसाळा लांबल्याने 30 नोव्हेंबरपर्यंत आपण हरभऱ्याची पेरणी करू शकतो. हरभऱ्याची पेरणी 20 तारखेनंतर करत असाल तर बियाण्याचे प्रमाण 10 ते 15 टक्के शिल्लक ठेवावे. यामुळे उत्पादनावर परिणाम होत नाही. तर 30 नोव्हेंबरनंतर हरभरा पेरणी केल्यास उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. हरभरा पिकामध्ये तीन प्रकारची वाणं असतात. लहान आकाराचे, मध्यम आकाराचे आणि मोठ्या आकाराचे बियाण्याच्या आकारमानानुसार एकरी प्रमाण ठरते.
advertisement
लहान दाण्याचे वाण असेल तर एकरी 25 किलो हरभरा बियाणे पेरावे. मध्यम आकाराचे हरभरा बियाणं असेल तर एकरी 30 ते 32 किलो बियाणे पेरावे. तर काबुली हरभऱ्याचे एकरी 40 किलो बियाणे पेरावे. हरभऱ्याची सर्वसाधारणपणे ट्रॅक्टरने पेरणी केली जाते. दोन ओळीतील अंतर 30 ते 45 सेमी तर दोन झाडांतील अंतर 10 ते 15 सेंटीमीटर राहील याची काळजी घ्यावी.
हरभरा पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया अवश्य करावी
थायरम दोन ग्रॅम आणि कार्बन बँजिम एक ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा चार ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे वापरल्यास भविष्यात मर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. जिवाणू खतामध्ये रायझोबियम आणि पीएसबी याची प्रक्रिया आपण बियाण्याला केली पाहिजे. हरभऱ्याला हेक्टरी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि आवश्यकतेनुसार पालाशची गरज असते, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना चे प्रमुख तसेच शास्त्रज्ञ एस. व्ही. सोनवणे यांनी सांगितलं.





