मोहोळ तालुक्यात राहणाऱ्या माऊली माने यांचे शिक्षण पदवीधरपर्यंत झाले आहे. मुंबई, पुणे या ठिकाणी नोकरीच्या शोधात जवळपास आठ ते नऊ महिने भटकंती केली पण नोकरी मिळाली नाही. शेवटी गावाकडे परत येऊन माऊलीने शेती करायचा निर्णय घेतला. कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल याचा अभ्यास करून माऊली माने या तरुणांनी एका एकरामध्ये बीन्सची लागवड केली.
advertisement
बीन्स लागवडीच्या अगोदर शेतामध्ये टोमॅटोची लागवड केलेली होती, पण बाजारात टोमॅटोला भाव मिळत नसल्याने टोमॅटोची बाग मोडून काढून त्यामध्ये बीन्सची लागवड केली. एका एकरात बीन्स लागवडीसाठी 2 किलो बियाणे लागले. बीन्सची लागवड केल्यावर नागअळी आणि करपा रोग होऊ नये यासाठी वेळोवेळी फवारणी करून घेतली. लागवड केल्यापासून 50 दिवसांमध्ये बीन्स तोडणीला सुरुवात होते. एकदा तोडणीला सुरुवात झाल्यास जवळपास दोन महिन्यांपर्यंत याची तोडणी सुरू असते.
सध्या बीन्सला बाजारभाव 30 रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहे. तर काही व्यापारी जाग्यावरूनच या बीन्सची खरेदी करून घेऊन जातात. एका एकरामध्ये बीन्स लागवडीसाठी 25 हजार रुपयांपर्यंतचा खर्च आला आहे. तर सर्व खर्च वजा करून पदवीधरपर्यंत शिक्षण घेतलेल्या माऊली माने या तरुणाला जवळपास तीन महिन्यात दीड ते दोन लाख रुपयांचा नफा मिळणार आहे. आतापर्यंत चार तोडे झाले असून बीन्स लागवडीचा खर्च निघाला आहे. शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसेल तर तरुणांनी निराश न होता शेती करावी, जर शेती नसेल तर स्वतःचा व्यवसाय करावा, असा सल्ला पदवीधरपर्यंत शिक्षण घेतलेले माऊली माने यांनी केला आहे.





