खरीप कांदा उशिरा बाजारात
यावर्षी उशिराने लागवड झाल्याने खरीप कांद्याचे पीक नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर बाजारात येण्याची शक्यता आहे. सध्या कर्नाटकातील कांद्याची आवक सुरू असून ती नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू राहील. या काळात जुना रब्बी कांदा आणि नवीन खरीप कांदा दोन्ही बाजारात येणार असल्याने, पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यामुळे दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, यंदा कांद्याची कोणतीही टंचाई भासणार नाही.
advertisement
परदेशी बाजारातील मागणी घटली
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याची मागणी लक्षणीयरीत्या घटली आहे. बांगलादेश, श्रीलंका आणि इतर शेजारी देशांनी स्थानिक उत्पादन वाढवले आहे. त्यामुळे भारतातून निर्यातीला वाव उरलेला नाही. परिणामी, देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता अत्यल्प आहे.
सध्या देशातील प्रमुख बाजारांमध्ये उन्हाळ कांद्याला केवळ २०० ते ९७५ रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या दरात आणखी घसरण झाल्यास कांदा उत्पादकांच्या अडचणींमध्ये भर पडणार आहे. कांदा निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी सांगितले की, “परदेशातून मागणी घटल्याने निर्यात ठप्प झाली आहे. परिणामी, देशांतर्गत बाजारात साठा वाढत असून भाव कोसळण्याची शक्यता आहे.”
कांदा बियाण्यांच्या निर्यातीवर बंदीची मागणी
विकास सिंग यांनी पुढे सांगितले की, भारतीय कांदा बियाण्यांची निर्यातही दीर्घकालीन संकट निर्माण करत आहे. बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि इतर शेजारी देश भारतीय कांदा बियाण्यांचा वापर करून स्वतःचे उत्पादन वाढवत आहेत. चीन आणि पाकिस्तानमध्येही भारतीय कांद्याच्या बियाण्यांची मागणी वाढत आहे. यामुळे भविष्यात भारताचा कांदा निर्यात बाजार धोक्यात येऊ शकतो.त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ कांदा बियाण्यांच्या निर्यातीवर बंदी घालावी, अशी मागणी कांदा निर्यातदार संघटनेने केली आहे.
शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक परिस्थिती
कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही. दुसरीकडे बाजारात साठा वाढल्यामुळे व्यापाऱ्यांकडे खरेदीसाठी दडपण येत आहे. शेतकऱ्यांनी सध्या जुना साठा सुरक्षित ठेवण्यासाठी हवेशीर कोठारे वापरणे, तसेच विक्रीसाठी बाजारभावावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.